‘लोकमत’ एक्सक्लूसिव
योगेंद्र शंभरकर
नागपूर : देशभरात टायगर कॅपिटल म्हणून ख्यात असलेले नागपूर क्षेत्र आता वाघांच्या अवयवांच्या तस्करीचा अड्डा ठरत आहे. मागील दाेन महिन्यात वनविभागाने सातत्याने ट्रॅप लावून सात-आठ धाडी टाकल्या व तस्करीचे अनेक प्रकरण प्रकाशात आणले. या धाडींमध्ये ३० पेक्षा अधिक आराेपींना ताब्यात घेतले आहे. यापैकी बहुतेक आराेपी नागपूर जिल्ह्यासह आसपासच्या क्षेत्रातील आहेत. स्थानिक ग्रामीण मध्यस्थांच्या मदतीने वाघाची नखे, मिशा, हाडे, खवले मांजर व इतर वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीची प्रकरणे प्रकाशात येत आहेत.
नागपूर वनविभागाने २९ जुलै राेजी याेजनेंतर्गत महाराष्ट्र सीमेलगत मध्य प्रदेशच्या बिछवासाहनी येथे पहिली धाड टाकून कातडी, पंजे व इतर साहित्यासह चार आराेपींना ताब्यात घेतले. सूत्रानुसार या प्रकरणातील तपासात आराेपींचे नागपूर कनेक्शन प्रकाशात आले. यानंतर देवलापार ते चंद्रपूरच्या पाेंभुर्णापर्यंत वाघांच्या अंगाची तस्करीची माहिती स्थानिक मध्यस्थांच्या मदतीने मिळाली. या आराेपींकडून जप्त करण्यात आलेले वाघांची नखे, मिशा, हाडांचा माेठा साठा पाहता माेठ्या प्रमाणात वाघांची शिकार झाल्याचे नकारता येत नाही. आजपर्यंतच्या तपासात आराेपी स्वत: वाघांची शिकार करण्यास नकार देत आहेत आणि वाघांची अंग दुसऱ्यांकडून आणल्याचे कबूल करीत आहेत. यानंतर सातत्याने व्याघ्र अंग तस्करी करणाऱ्या आराेपींची संख्या वाढत चालली आहे.
२०१२-१३ मध्ये बहेलिया शिकाऱ्यांचा बाेलबाला
जाणकारांच्या मते वाघांच्या शिकारीसाठी विदर्भातील जंगले दशकांपासून शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. मात्र वन विभागाला पहिल्यांदा २०१२-१३ मध्ये मध्य प्रदेशच्या कटनी भागातून बहेलिया शिकाऱ्यांची टाेळी पकडण्यात यश मिळाले हाेते. सुरुवातीला ११ आराेपींच्या अटकेने तपासाची सूत्रे हलली आणि पुढे ३५ आराेपी जाळ्यात आले हाेते. पुढे काही महिन्यात तपास मंदावल्याने प्रकरण सीबीआयकडे साेपविण्यात आले हाेते.
विक्रीसाठी आता बाहेर निघत आहेत वन्यजीवांचे अंग
वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांनुसार काेराेना काळात वनक्षेत्राच्या आसपास राहणाऱ्या ग्रामीणांच्या राेजगारावर परिणाम झाला हाेता. यादरम्यानच वनक्षेत्रात घुसखाेरी करून वाघ व इतर वन्यप्राण्यांची शिकार करण्यात आल्याचे मानले जात आहे. आता वन्यप्राण्यांचे अंग विक्रीसाठी बाहेर काढले जात आहेत.
टीमवर्कमुळे माेठे यश
सूत्रानुसार नागपूर वन विभागात एका दबंंग अधिकाऱ्याचा प्रवेश हाेताच विभागाचे अधिकारी व कर्मचारी टीमवर्कने काम करीत आहेत. बुटीबाेरी, चंद्रपूर, रामटेक आणि पेंच टायगर रिझर्वचे अधिकारी टीमवर्कने काम करीत आहेत. यासाेबतच मध्य प्रदेशातील अधिकाऱ्यांशीही समन्वय ठेवला जात आहे. ज्यामुळे अंग तस्करी करणाऱ्यांना सातत्याने अटक केली जात आहे.
आराेपींना शाेधू काढू
जिल्ह्याचे उपवनसंरक्षक डाॅ. भारतसिंह हाडा म्हणाले, जंगल आणि वन्यप्राण्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. वन विभागाची टीम सातत्याने तस्करांना ट्रॅप करीत आहे. या मध्यस्थांच्या माध्यमातून खऱ्या शिकाऱ्यांना शोधून काढण्याचा विश्वास त्यांनी दिला. आतापर्यंत अटक झालेले आराेपी स्थानिक आहेत पण त्यांच्या कनेक्शनमध्ये असलेल्या आराेपींपर्यंत पाेहचणे शक्य हाेईल, असा विश्वास त्यांना आहे.