कोलितमारा येथील घटना : महिनाभरातील दुसरी घटना नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा बीटात पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. मंगळवारी सकाळी जंगल सफारी करणाऱ्या काही पर्यटकांना कम्पार्टमेंट क्र. ६६९ मध्ये रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत तो आढळून आला. माहिती सूत्रानुसार दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या पर्यटकांनी लगेच वन विभागाच्या गेटवरील वन कर्मचाऱ्यांना वाघाची माहिती दिली. त्यावर वन कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातील वरिष्ठांना कळविले. त्यानुसार दुपारी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक ऋषिकेश रंजन यांच्यासह डॉ. कडू, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी प्रफुल्ल भांबूरकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाचे प्रतिनिधी कुंदन हाते व अन्य वरिष्ठ वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान वरिष्ठांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्या वाघाच्या बाजूलाच रक्त सांडलेले दिसून आले. तसेच मृत्यू झालेल्या वाघाच्या मानेवर गंभीर जखमाही दिसून आल्या. त्यावरून सोमवारी रात्री दोन वाघांच्या झुंजीत हा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, मागील महिनाभरात पेंचमधील ही दुसरी घटना आहे. गत जानेवारी महिन्यात सुद्धा येथील टुयापार बीटात एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आता ही दुसरी घटना पुढे आली आहे. याशिवाय नागपूर वन विभागातील घटनांचा विचार करता मागील दोन महिन्यात चार वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक खापा, एक पवनी व दोन पेंचमधील वाघांचा समावेश आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वाघांच्या या मृत्यू सत्रावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
पेंचमध्ये पुन्हा एका वाघाचा मृत्यू
By admin | Published: February 15, 2017 3:20 AM