वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचाराने शेतकरी त्रस्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शेतात बांधून असलेल्या गुरांवर हल्ला चढवित वाघाने एका वासराची शिकार केली. ही घटना तालुक्यातील जवळी शिवारात रविवारी (दि.३) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
अशोक परमारे, रा. जवळी, ता. भिवापूर यांची जवळी शिवारात शेती असून, त्यांनी नेहमीप्रमाणे शेतात आपली गुरे बांधून ठेवली हाेती. दरम्यान रविवारी सकाळी शेतकरी शेतात गेला असता, गुरांपैकी एका वासराचा फडशा पाडल्याचे दिसून आले. परिसरात वाघ वा बिबटाच्या पाऊलखुणा आढळल्याने शेतकऱ्याने वन विभागाला सूचना दिली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गुरांवर हल्ला चढविणारा वाघ की बिबट हे स्पष्ट झाले नसून वन विभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून कारवाई सुरू केली आहे.
परमारे यांची शेतात पाच जनावरे बांधून हाेती. त्यापैकी वाघाने एका वासराचा फडशा पाडला. यात शेतकऱ्याचे नुकसान झाले असून, वन विभागाने शेतकऱ्यास तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
....
मानव-वन्यजीव संघर्ष पेटला?
तालुक्याचा अर्ध्याहून अधिक भाग जंगलव्याप्त व जंगल प्रभावित आहे. एकीकडे वन्यप्राण्यांचा हैदोस तर दुसरीकडे परतीचा पाऊस यामुळे खरीप हंगामातील अर्धीअधिक पिके जमीनदाेस्त झाली. वन्यप्राण्यांचे कळप धानाच्या पिकात धुडगूस घालून अक्षरश: पीक तुडवितात. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपविभागातील नवेगाव (साधू) शिवारात विषप्रयोगातून वाघासह तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. त्यामुळे जंगलव्याप्त भागात मानव वन्यजीव संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. याला जबाबदार कोण, हा चिंतनाचा प्रश्न आहे.