नागपूर : नागपूर शहरापासून २० किलोमीटर अंतरावरील खापरी-फुकेश्वर मार्गावर वाघ दिसल्याची जोरदार चर्चा आहे. यासंबंधित एक व्हिडीओही व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात फुकेश्वर शिवारात सकाळी हा वाघ काही नागिरकांना दिसल्याची माहिती आहे. गावकऱ्यांनी वन विभागाला कळविल्यावर कर्मचाऱ्यांनी परिसर गाठला. पथकातील काहींना हा वाघ दिसल्याची माहिती आहे. दुपारी साडेचारच्या दरम्यान पुन्हा जुनापनी जंगलाकडे तो वाघ परत गेल्याचीही चर्चा होती.
काही नागरिकांनी वाघाचा व्हिडीओ काढला. तो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही बातमी सर्वत्र पसरली. उत्तर उमरेड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट दिल्यावर या परिसरात वाघ असल्याची खात्री त्यांनाही पटली. यामुळे परिसरातील गावकऱ्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वन विभागाचे पथक वाघाच्या हालचालीवर नजर ठेवून आहे.
मटकाझरी उत्तर उमरेड वन परिक्षेत्राअंतर्गत फुकेश्वर शेतशिवारात काम करीत असणाऱ्या गावकऱ्यांना हा वाघ दिसला. ही माहिती गावात पोहोचल्यावर गावकऱ्यांनी जमावाने येऊन वाघाला पिटाळून लावले. गावकरी आरडाओरड करीत असून वाघ पळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
उत्तर उमरेड व बुटीबोरी वन विभागाच्या पथकाने वडद, खापरी, जुनापानी, मटकाझरी आदींसह अनेक गावांमध्ये खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. ऐन हंगामात वाघ दिसल्याने शेतकरी धास्तावले आहेत.