बेला : वाघाची कातडी विकण्याचा व्यवहार करीत असताना वन विभागाच्या उमरेड टीमने सावनेर तालुक्यातील खापा परिसरात गुरुवारी (दि. २९) कारवाई करीत कातडी विकणाऱ्यास ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून वाघाची कातडी व पंजे जप्त केले असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची वन काेठडी सुनावली आहे.
माेतीलाल केजा सलामे (५५, रा. बिछवासानी, ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. माेतीलाल हा खापा (ता. सावनेर) परिसरात वाघाची कातडी विकत असल्याची माहिती वन विभागाच्या उमरेड कार्यालयाला मिळाली हाेती. त्यामुळे या कार्यालयाच्या पथकाने खापा परिसर गाठून त्याचा शाेध घेतला. त्याला त्याच्या खापा शिवारातील शेतातून ताब्यात घेत कसून चाैकशी केली. त्याने वाघाची कातडी असल्याचे कबूल करताच त्याच्याकडून कातडी व पंजे जप्त केले. उमरेड वन विभागाच्या पथकाने माेतीलालला खापा वन विभागाच्या सुपूर्द केले. त्यांनी आराेपीला सावनेर येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (दि. ३) वन काेठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवन संरक्षक भरतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठाेकळ, पी. एन. नाईक, माेहाेड, क्षेत्र सहायक रवींद्र शुक्ला, ए. एच. राठाेड, वनरक्षक डी. आर. डाेंगरे, व्ही. एस. शेंडे, ए. पी.माेडक, डी. जी. भाेसले, पी. जी. लामसे, पंकज काेल्हे, चेतन कृष्णापुरी गाेस्वामी यांच्या पथकाने केली.
...
वाघाची शिकार केली कुठे?
माेतीलालने खापा परिसरात वाघाची कातडी विकायला आणली हाेती; मात्र त्याने किंवा इतरांनी त्या वाघाची शिकार नेमकी कुठे व कशी केली, याबाबत वन विभाग तपास करीत आहेत. त्यांनी वाघाची शिकार मध्य प्रदेशातील बिछवासानी भागात केली असावी, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यास वन विभागाच्या हाती वाघाची शिकार करणाऱ्यांपासून तर त्याच्या कातडी व अवयवांची तस्करी करण्यापर्यंतचे माेठे मासे हाती लागू शकतात.