लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शेतातील गाेठ्यात बांधून असलेल्या गुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवून एका गायीची शिकार केली. ही घटना महादुला (ता. रामटेक) शिवारात रविवारी (दि.१६) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत पसरली असून, शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
रामटेक तालुक्यातील गुगुलडाेह गाव जंगलव्याप्त भागात आहे. गुगुलडाेह ते महादुला हे अंतर ३ कि.मी. आहे. जंगलातील हिंस्र प्राणी भक्ष्याच्या शाेधात गावात येत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. महादुला येथील शेतकरी अर्जुन रामाजी झाडे यांनी आपली जनावरे नेहमीप्रमाणे शेतातील गाेठ्यात बांधून ठेवली हाेती. दरम्यान, पट्टेदार वाघाने गाेठ्यातील गुरांवर हल्ला चढविला. गाेठ्यातील इतर जनावरे दावे ताेडून पळाली. मात्र, गायीचे दावे मजबूत असल्याने वाघाच्या तावडीत सापडली. वाघाने गायीची शिकार करीत तिचा फडशा पाडला. साेमवारी सकाळी अर्जुन शेतात गेले असता, गाय मृतावस्थेत आढळली. तेथे वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. याबाबत वनविभागाला सूचना देण्यात आली.
वनसंरक्षक के. व्ही. बेलकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शेतकरी अर्जुन झाडे यांनी रामटेक वनविभागाकडे तक्रार केली आहे. वनसंरक्षक बेलकर यांनी सांगितले की, घटनास्थळी आम्ही ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वाघाने शिकार केल्यावर ताे परत तिथे येताे. यामुळे वाघाचा शाेध घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले. या घटनेमुळे अर्जुन झाडे यांचे ४० हजारांचे नुकसान झाले. वनविभागाने त्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच तातडीने वाघाचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.