लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंगलव्याप्त भाग असलेल्या कोंढाळी ते न्यू बोरकडे जाणाऱ्या मार्गावरील लगतच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढला आहे. अनेक गावकऱ्यांनी वाघ पाहिल्याचा दावा केला आहे. यामुळे या परिसरामध्ये वाघाची दहशत पसरली आहे.
हा परिसर जंगलव्याप्त असून काही गावे अगदी जंगलाच्या काठावर आहेत. यापैकी मासोद, धोतीवाडा, गरमसूर आदी गावांचा जंगलाशी सतत संबंध येतो. अनेक दिवसानंतर या गावालगत वाघ सतत दिसत असल्याचे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन हंगामाच्या दिवसात वाघोबा दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांना शेतावर जाणेही आता धोकादायक होऊन बसले आहे. काही शेतकऱ्यांनी तर, आपल्या गाई वाघाने मारल्याचाही दावा केला आहे. या परिसरात काही वन्यजीव प्रेमी गेले असता ही बाब निदर्शनास आली. या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र खबरदारीसाठी काय पावले उचलणार, हे मात्र कळलेले नाही.