लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवडाभरात मिहान परिसरात फिरणारा वाघ आता परिसरातील गावांकडे भटकला आहे. सुकळी, खडगा या गावांजवळ वाघाची पावले आढळल्याने आणि बाजारगावलगतच्या नागपूर-अमरावती मार्गावर वाघ दिसल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे. दरम्यान, वन विभागाने दक्षता व सावधगिरीचा उपाय म्हणून गावकऱ्यांना सरपंचांच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.या वाघाने आपला मोर्चा आता बुटीबोरीकडे वळविल्याचे दिसत आहे. बुधवारी सुमठाणा सुकळी, खडगा गावाजवळील शेतांमध्ये वाघाचे पगमार्क स्पष्टपणे आढळून आले. वनविभागाच्या पथकानेही याची पाहणी करून शहानिशा केली. काही गावकऱ्यांनी सुमठाणा गावाच्या दिशेने वाघ जाताना पाहिल्याचा दावा केला आहे. वनविभागाने याची दखल घेऊन गस्त वाढविली आहे. आपल्या परिसरात वाघ असल्यावर काय खबरदारी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शनही सुरू के ले आहे.दरम्यान मंगळवारी रात्री ८.३० वाजता बाजारगाव लगतच्या पेपर मिल परिसरातील अमरावती-नागपूर मार्गावर वाघ पाहिल्याचा दावा केला जात आहे. काही काळ वाहने थांबवून अनेकांनी हा वाघ पाहिला. वाहनांच्या हॉर्ननंतर वाघ जंगलाच्या दिशेने गेल्याचेही सांगितले जात आहे.दक्षतेचा एक भाग म्हणून गुरुवारी सकाळी वन विभागाकडून बुटीबोरीलगतच्या गावांमध्ये वाघाचे मास्क वाटण्यात आले. डोक्याच्या मागील भागाला हे मास्क लाऊन शेतकरी आता शेतावर कामाला जात आहेत. शेतात काम करताना वाकून काम केले जाते. अशा वेळी वाकलेला माणूस वाघाला एखाद्या प्राण्यासारखाच वाटतो. त्यामुळे तो मागून हल्ला करतो. मास्क मागील बाजून लावल्यास हा धोका टळू शकतो. त्यामुळे मास्क मागील बाजूने लावण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. या सोबतच, गुरुवारी सकाळी सुमठाणा, सुकळी, खडका आदी गावांमधील सरपंच, उपसरपंच आणि पोलीस पाटलांची बैठक नागपुरातील सेमिनरी हिल्सच्या वनसभागृहात घेण्यात आली. या बैठकीनंतर मास्क डोक्यामागे लावून शेतावर काम कसे करावे, याचे प्रात्यक्षिक वाघ फिरत असलेल्या परिसरात सर्वांना नेऊन देण्यात आले. तसेच आवश्यक त्या खबरदारीसाठी सूचनाही देण्यात आल्या. परिसरात पोस्टर आणि बॅनर लावण्यात आले असून त्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, विनीत अरोरा, अविनाश लोंढे, एसीएफ काळे, आरएफओ विजय गंगावने, चांदेवार, ठोकळ यांच्यासह वन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
संभाव्य भ्रमणमार्गावर लावले ट्रॅप कॅमेरेवाघाची हालचाल आणि त्याचा वावर लक्षात घेता त्याच्या संभाव्य भ्रमणमार्गावर वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. बुटीबोरी परिसरातील गावांच्या शिवारात आणि वनक्षेत्रात ते लावण्यात आले असून पथकाकडून वाघावर निगराणीही ठेवली जात आहे.२४ तास पथक तैनातबुटीबोरी जंगलाच्या परिसराकडे जाताना काही गावे ओलांडून वाघाला जावे लागणार, हे गृहित धरून २४ तासांचे गस्ती पथक तैनात करण्यात आले आहे. हा मार्ग शेतकऱ्यांचाही असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पथक आवश्यक त्या सूचना गावकऱ्यांना देत आहे. वन्यजीव विशेषज्ज्ञ आणि वन अधिकारी यावर उपाययोजना आखत आहेत.