लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. मध्य प्रदेशला तर टायगर हाऊसच म्हटले जाते. मात्र देशभरातील वाघांच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टेस्टसाठी हैदराबादला व्हिसेरा पाठवावा लागतो. त्याचा अहवालही विलंबाने येतो. परिणामत: तपासही लांबतो. यामुळे नागपूरसारख्या ठिकाणी ही लॅब उभारणे अन्य राज्यांच्याही दृष्टीने सोईचे होणार आहे.
जगभरात भारतामध्ये असलेली वाघांची सर्वाधिक संख्या असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. देशातील टॉपटेन वाघांच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात असलेल्या ३१२ वाघांपैकी ३०० वाघ एकट्या विदर्भातील जंगलात आहेत. राज्यात असलेल्या सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भातच आहेत. यामुळे विदर्भातील व्याघ्रसंवर्धनाची जबाबदारी आता वाढली आहे.
वन विभागाच्या आकडेवारीनुसार, भारतात सर्वाधिक वाघ मध्य भारतात आहेत. वाघांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी व्हिसेरा हैदराबादमधील सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठविला जातो. नागपूरनजीक १३ व्याघ्रप्रकल्प असून याठिकाणी नेहमी घटना घडत असतात. बरेचदा मानव वन्यजीव संघर्षातून घडणाऱ्या घटनांमध्ये वाघांचा जीव जातो. विजेच्या सापळ्यात तसेच शिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडूनही वाघांचा मृत्यू होतो. अशा वेळी आरोपींकडून हस्तगत केलेली वाघाची हाडे, अवयव तपासण्यासाठी व त्याच्या तातडीने अहवालाची प्रतीक्षा असते. मात्र महिने लोटूनही हैदराबादवरून अहवाल मिळत नसल्याचा अनुभव आहे. अलिकडे वाघांची संख्याही विदर्भात वाढली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नागपुरात लॅब असण्याची गरज आहे.नागपुरातून २०१३-१४ मध्येच गेला प्रस्तावनागपुरात ही प्रयोगशाळा व्हावी अशी मागणी करणारा प्रस्ताव आराखड्यासह आणि जागेच्या नकाशासह २०१३-१४ मध्येच गेला आहे. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाने यात पुढाकार घेऊन तो वनविभागापुढे मांडला होता. पशुवैद्यक महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभागाच्या बाजूला असलेली जागाही यासाठी सुचविली आहे. महाविद्यालयालादेखील अध्ययनासाठी याचा उपयोग होणार असल्याने महाविद्यालयाच्या मनुष्यबळाचा आणि अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याची तयारीही दर्शविण्यात आली आहे. मंत्रालयापर्यंत हा प्रस्ताव पोहचूनही अद्यापतरी यावर विचार झालेला नाही.अनेक नमुने हैदराबादसह डेहराडूनलाही जातात. मात्र तिकडे कामाचा अधिक ताण असल्याने लवकर अहवाल येत नाही. परिणामत: गुन्हेगारांना संधी मिळते. पुरावेही नष्ट होतात. वन्यजीवांच्या मृत्यूनंतर अहवाल येण्यास अधिक काळ लोटल्यास गांभीर्य नष्ट होते. वाघ, बिबटांशिवाय अनेक प्राण्यांचे मूत्यू अहवालाविनाच इतिहासजमा होतात. त्यामुळे मध्य भारतात नागपुरात लॅब होणे सर्व दृष्टीने योग्य ठरेल.- विनित अरोरा, सेक्रेटरी, सृष्टी पर्यावरण मंडळ