लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान व वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात सोमवारी व्याघ्र सप्ताहाचे उद्घाटन झाले.
उद्घाटन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन, व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान केंद्राचे कुलगुरू कर्नल डॉ.प्रा. ए. एम. पातूरकर यांच्या हस्ते वनभवनातील कमांड कंट्रोल रूममध्ये झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. एस. पी. यादव, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या उपमहानिरीक्षक (वने) डॉ. सोनाली घोष हे ऑनलाईन माध्यमातून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
३१ मे ते ६ जून या काळात वाघ या वन्यप्राण्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याकरिता गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानासह केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर तसेच सेव्हज संस्था मुंबईच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पोस्टर तसेच वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमादरम्यान वाघ-स्वभाव व दृश्यछटा या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनी तसेच व्याघ्र छायाचित्र स्पर्धा प्रदर्शनीचे उद्घाटन काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही प्रदर्शिनी नागरिकांकरिता www.gorewadaproject.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय पोस्टर स्पर्धेत देशभरातून २,५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निकाल ५ जूनला जाहीर करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय प्राणी उद्यान नवी दिल्लीचे संचालक रमेश पांडे यांनी ‘मानवी वर्चस्व असलेल्या वनक्षेत्रातील व्याघ्र संवर्धन’ या विषयाने पहिल्या दिवशी प्रारंभ झाला. भारतीय वन्यजीव संज्ञा डेहराडून येथील शास्त्रज्ञ डॉ. पराग निगम यांचेही व्याख्यान झाले. यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक (नियोजन) संजीव गौड, नागपूर प्रदेश महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) डॉ. प्रवीण चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
असा आहे उपक्रम
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘वन्यजीव संवर्धनातून सहजीवनाकडे-लोकसहभाग’या उपक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ मार्चला झाली. वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वाच्या ७५ भारतीय प्राण्यांच्या प्रजातींबद्दल जनजागृतीसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यावतीने ‘७५ आठवडे, ७५ प्रजाती’ हा उपक्रम देशभरातील ७५ प्राणिसंग्रहालयाच्या सहभागातून साजरा केला जात आहे. प्रत्येक आठवड्यात एक प्रजातीला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमाचे नियोजन आहे.
...