निशांत वानखेडे
नागपूर : नुकताच भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढल्याचा उत्सव आपण साजरा केला आहे; मात्र अशात केवळ वनस्पती आधारित अन्नाचा प्रचार करणाऱ्या ‘वेगन’ समूहाकडून करण्यात येत असलेला एक दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. २०२६ पर्यंत वन्यप्राण्यांच्या बहुतेक प्रजाती पृथ्वीवरून नामशेष हाेण्याचा धाेका त्यांनी व्यक्त केला आहे; मात्र हा ‘दावा किती खरा किती खाेटा’ पण विचार करायला लावणारा आहे.
युनायटेड हार्ट संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डाॅ. सैलेश राव यांनी ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ ने केलेल्या अभ्यासाद्वारे ही शक्यता वर्तविली हाेती. डब्ल्यूडब्ल्यूएफने १९७० पासून वन्यजीवांवर केलेल्या अभ्यासानुसार २०१० पर्यंत जगभरातील वन्यजीवांची संख्या ५२ टक्क्यांनी घटली हाेती. त्यानंतर दाेनच वर्षांत हा आकडा ५८ टक्क्यांवर गेला. पुढे चार वर्षांनंतर २०१६ साली वन्यप्राणी ६८ टक्के घटल्याचा दावा करण्यात आला. या ग्राफनुसार २०२६ हे वर्ष ‘ईयर झिराे’ मानण्यात आले असून यावर्षी जगातून वन्यप्राणी नामशेष हाेतील. याचा अर्थ पुढच्या तीनच वर्षात आपल्या जंगलातील वाघ, बिबटे, हरीण, अस्वल असे वन्यप्राणी अजिबात दिसणार नाहीत. हा दावा तसा अतिशयाेक्ती वाटताे पण ‘वेगन’ समर्थक यावर ठाम आहेत.
अहमदाबादमध्ये कार्य करणाऱ्या मूळच्या नागपूर निवासी पर्यावरण कार्यकर्त्या मंजुश्री अभिनव या नुकत्याच नागपुरात आल्या आणि या विषयावर त्यांनी सेमिनारचे आयाेजन केले. त्यांनी ऑक्सफाेर्डसह विविध जागतिक संस्थांच्या अभ्यासाद्वारे ‘ईयर झिराे’च्या दाव्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या मते जगात मांस व दुग्धजन्य पदार्थांचा अन्नात अतिवापर हाेत आहे. दरवर्षी ९२ अब्ज कृषीप्राणी व २.६ ट्रिलियन सागरी जीव मारून खाल्ले जातात. मग ही गरज भागविण्यासाठी त्यांची कृत्रिमरित्या पैदास केली जाते. मग या प्राण्यांचा चारा व इतर गरजेसाठी जंगले कापली जातात. दरवर्षी एका फुटबाॅलच्या मैदानाएवढी जंगलांची कत्तल केली जात आहे.
पृथ्वीवरची ७० टक्के कृषीभूमी जनावरांच्या गरजेसाठी वापरली जाते. माणूस स्वत:च्या अन्नापेक्षा पाचपट अन्न कृषी जनावरांसाठी उत्पादित करताे. अत्याधिक वाढलेल्या कृषी जनावरांचा थेट हरितगृह वायूच्या उत्सर्जनाशी संबंध आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या आता केवळ १.८ टक्के उरली आहे, जी २०२६ पर्यंत शून्य टक्क्यांवर येईल, असा दावा मंजुश्री अभिनव यांनी केला आहे. मानव आपल्या गरजेसाठी पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन बिघडवित असल्याचे त्या म्हणाल्या. यापुढे प्राणी आधारित अन्नाऐवजी केवळ वनस्पती आधारित अन्न हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक वन्यजीव कार्यकर्त्यांना या दाव्यात तथ्य वाटत नसले तरी अनियंत्रित जंगलताेडीबाबत त्यांचे एकमत आहे. वने व वन्यजीव संवर्धनाची गरज त्यांनीही व्यक्त केली आहे.