ऑनलाईन लोकमत नागपूर : पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडी भागात वाघांचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे. तोतलाडोह संरक्षित क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी व त्यातून होत असलेल्या शिकारीतून परिसरातील वाघांसह वन्यजीव नाहीसे झाले होते. परंतु वन विभागाने राबवलेल्या विशेष अभियानामुळे या परिसरातील मासेमारीच्या नावावर सुरू असलेल्या वन्यजीवांच्या शिकारीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. त्याचाच परिणाम या परिसरात पुन्हा वाघ परतले आहेत. शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट दिली . तेव्हा हा सुखद क्षण प्रत्यक्ष अनुभवता आला.एसीएफ भागवत यांनी सांगितले की, पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोडलाडोह परिसरात असलेल्या गोलपहाडी येथे अनेक दशकांपासून अवैध मासेमारी सुरू होती. मासेमारी करण्यासाठी येणारे लोक केवळ माशांचीच शिकार करीत नव्हते तर ते हरीण, ससे यासारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांचीही शिकार करायचे. वाघांसह मगरीचीही शिकार केली जात होती. हे एक मोठे रॅकेट होते. नागपूर ते सिवनीपर्यंत त्याचे तार जुळले होते. मासेमारी करणाºया स्थानिकांच्या मदतीने वन्यप्राण्यांची शिकार केली जात होती. यासाठी मासेमारी करण्यासाठी काही लोकांना वेतनसुद्धा दिले जात होते. काही महिन्यांपूर्वी या परिसरात जेव्हा दोन शिकाऱ्यांना वाघाच्या हाडासह पकडण्यात आले. तेव्हा त्या प्रकरणाची चौकशी दरम्यान स्थानिक मासेमारी करणाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून आले. त्यातून अनेक मासेमारी करणाऱ्यांना अटक केली. तेव्हा हे रॅकेट उघडकीस आले. या अवैध मासेमारी व शिकारीची जवळपास १२० कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल असल्याचे तेव्हा उघडकीस आल्याचे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे ही मासेमारी बंद करणे एक आव्हान होते. यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जेव्हा कधी कारवाई केली जात होती. तेव्हा मासेमारी करणारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करीत होते. पेट्रोल बॉम्बने ते हल्ले करायचे.फिल्ड डायरेक्टर ऋषिकेश रंजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यासाठी पुढाकार घेतला. एसआरपीएफ आणि स्पेशन टायगर प्रोटेक्शन फोर्स यांनी ८० जणांची एक विशेष टीम तयार केली. विशेष योजना तयार करण्यात आली. संपूर्ण परिसरात नेटवर्क तयार करण्यात आले. पेट्रोलिंग बोटीसह दोन अतिरिक्त बोटी मागवण्यात आल्या. ४५ दिवस हे अभियान राबवण्यात आले. या अभियानात मासेमारीसाठी लपवून ठेवण्यात आलेल्या १५० बोटी आणि मासेमारी व वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लपविण्यात आलेले पाच हजार जाळ्या पकडून त्या नष्ट करण्यात आल्या. बोट तयार करणाऱ्या स्थानिकांना बोटीची संपूर्ण माहिती ठेवण्यास सांगण्यात आले. परिणामी या परिसरातील मासेमारीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यामुळे आता येथे पुन्हा वन्यजीव सुरक्षित झाले आहे. वाघही परतले आहेत.