नागपूर : उपराजधानीत मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा असल्यामुळे पोलिसांसमोर वाहतूकीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे. रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे दोन दिवस रहाटे कॉलनी, मेडिकल चौक, तुकडोजी महाराज चौकासह चार मार्ग ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहेत.
यासंदर्भात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी अधिसूचना जारी केली आहे. १ व २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती यांच्यासोबतच राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्हीआयपीदेखील शहरात राहणार आहेत. त्यामुळे वर्धा मार्ग, धंतोली, रहाटे कॉलनी, सिव्हील लाईन्स, रेशीमबाग चौक, मेडिकल चौक, तुकडोजी चौक इत्यादी मार्गांवर वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात ठेवून चार मार्गांवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाला यासंदर्भात सहकार्य करावे असे आवाहन चेतना तिडके यांनी केले आहे.
या मार्गावर ‘नो पार्किंग’
- रहाटे कॉलनी ते धंतोली पोलीस ठाणे- धंतोली पोलीस ठाणे ते भोलागणेश चौक- बैद्यनाथ चैक ते मेडीकल चौक ते रेल्वे मेन्स हायस्कुल टी पॉईन्ट कांबळे चौक- रेल्वे मेन्स् हायस्कुल टी पाॅईन्ट कांबळे चौक ते जगन्नाथ मंदीर ते सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल तुकडोजीमहाराज पुतळा
- बाहेरून येणारी वाहतूक वळविणार
शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वर्धा मार्गाकडून येणारी जड वाहतूक जामठा टी पॉईंट येथे थांबविण्यात येईल किंवा आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. त्याचप्रमाणे दिघोरी नाका ते मेडिकल व मानेवाडा चौकाकडे वाहतूक आऊटर रिंग रोडने वळविण्यात येईल. कळमेश्वर व वाडीमार्गे येणारी जड वाहतूक नवीन काटोल टोल नाक्यावरून आवश्यकतेनुसार इतर मार्गाने वळविण्यात येईल.