लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या नामकरणाला असलेल्या विरोधामुळे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त केला होता. काटोल रोड व कार्यक्रम स्थळाची घेराबंदी करण्यात आली होती. काटोल रोडवर ड्रोननेसुद्धा नजर ठेवली जात होती. मोबाईल सर्व्हिलन्स वाहनांमध्ये स्वार अधिकारी यावर लक्ष ठेवून होते. त्यांना थेट पोलीस आयुक्त वारंवार दिशानिर्देश देत होते. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांचा ठरलेला मार्ग ऐनवेळी बदलविण्यात आला होता.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यामुळे आदिवासी समाज संघटना व विदर्भवादी संघटनांनी याला विरोध दर्शविला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन २६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले. आदिवासी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेेतृत्वात बंदोबस्त करण्यात आला. विमानतळापासून तर कार्यक्रम स्थळापर्यंत एकूण २,५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. राजभवन चौक ते काटोल नाका चौकापर्यंत बंदोबस्त अधिक होता. प्रत्येक चौकात पोलीस तैनात होते. गिट्टीखदान चौकापासून पोलिसांची मानव साखळी तयार करण्यात आली होती. काटोल रोडवरील वाहतूक वळविण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी ३०० लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणारे नेते व व्हीआयपीसह कुणालाच प्रवेश देण्यात आला नाही.