लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताची पोलिसांनी तयारी पूर्ण केली आहे. यावेळीचा बंदोबस्त अधिकच कडक राहणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बंदोबस्ताचा पॅटर्न बदलवत अधिवेशनाच्या पूर्वीपासूनच दहशतवादी विरोधी सेल (एटीसी), नक्षलवादी विरोधी पथके (एएनओ) आणि गुन्हे शाखेची पथके सक्रिय केली आहे. झोपडपट्टी सर्चिंग आणि कोंम्बिग ऑपरेशनही सुरू करण्यात आले आहे.सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे सरकार नागपुरात येणार आहे. ठाकरे सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनादरम्यान आत-बाहेर कसलीही गडबड होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी सात दिवसांपूर्वीच बंदोबस्ताचा आराखडा तयार केला. कोण, कुठे राहील, कोणती जबाबदारी पार पाडेल, ते ठरवून देण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोलवून घेतले जाते. त्यांनी गुरुवारपासून आमद (आगमनाची सूचना) देणे सुरू केले आहे. शुक्रवारपासून त्यांना तैनाती दिली जाणार आहे. बाहेरून येणाऱ्या पोलिसांच्या सोबतीला स्थानिक अधिकारी-कर्मचारी देऊन त्यांच्याकडून बंदोबस्त करवून घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, येथे कडाक्याच्या थंडीत कर्तव्यावर येणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला चांगले जेवण आणि उबदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर पोलीस आयुक्तांनी भर दिला आहे. कोणत्याही पोलिसांची जेवण आणि निवासाबाबतची कसलीही कुरबूर येऊ नये, त्यांना अंघोळीच्या गरम पाण्यापासून तो ओढण्यासाठी उबदार कपड्यांपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधीची जबाबदारी काही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
शनिवारी घेणार आढावाराज्य राखीव दलाच्या सात कंपन्यांसह राज्यभरातून जवळपास पाच हजार पोलीस बंदोबस्तासाठी नागपुरात येणार आहेत. शनिवारी सकाळी पोलीस महासंचालकही पोहचतील. ते एकूणच बंदोबस्ताचा आढावा घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके आणि कमांडोज राहणार असून त्यांचे निवासस्थान ‘रामगिरी’वर मोठा ताफा तैनात असणार आहे. तेथे तसेच आमदार निवास, रविभवन, नागभवन येथेही ओळखपत्रांशिवाय कुणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.
विशेष सुरक्षा कवचपोलीस रात्रंदिवस बंदोबस्त ठेवणार आहेत. विधानभवन, नागभवन, रविभवन आणि आमदार निवास यासह विविध ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. विधानभवनाला फोर्सवन, कमांडो, एसआरपीएफ, अतिजलद प्रतिसाद पथकाचे विशेष सुरक्षा कवच राहणार आहे. दंगल विरोधी पथक, जमाव हिंसक झाल्यास पाण्याचा मारा करणारे वरुण आणि वज्रसुद्धा सज्ज राहणार आहे.
मोर्चा पॉईंट सज्जसामाजिक संघटना, कर्मचारी संघटना मोर्चाच्या माध्यमातून विधानभवनावर धडकतात. या मोर्चांना मॉरिस कॉलेज टी-पॉईंट, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, टेकडी रोड, लिबर्टी टी-पॉईंट, एलआयसी चौक येथे रोखले जाईल. मोर्चांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक विभाग सक्रिय झाला असून फूटपाथ मोकळे करणे सुरू झाले आहे.
पोलिसांच्या सुट्या रद्दअधिवेशनादरम्यान स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जे यापूर्वी सुट्यांवर गेले आहेत, अशांना परत बोलविले जाणार आहे. पोलिसांनी संवेदनशील भाग आणि झोपडपट्ट्यांवर नजर रोखली आहे. त्या ठिकाणी कारवाई सुरू होणार आहे.