संजय रानडे
नागपूर : पुन्हा एकदा नागपूरच्या जवळ वाघिणीचे अस्तित्व असल्याची माहिती समाेर आली आहे. वर्धा रोडवरील मिहान परिसरात तलावाजवळ वाघीण आणि तिचे १२ व १४ महिने वयाचे शावक आढळून आले. अनेक वन्यजीवप्रेमींना रविवारी या तलावावर पक्षी निरीक्षणादरम्यान दोन शावकांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे सांगितले. दरम्यान या वन्यजीवांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने परिसरात गस्त वाढवली आहे.
वन्यजीवप्रेमी आणि नियमित पक्षी निरीक्षक सारंग पिंपरकर यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले, १७ एप्रिलच्या सायंकाळी नागपूरपासून १५ किमी अंतरावर मित्रांसमवेत पक्षी निरीक्षणाला गेले असता १२ ते १४ महिन्याचे वाघाचे दाेन शावक ५०० मीटर अंतरावर दिसून आले. शावक आणि वाघिणीच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांचे नेमके ठिकाण शोधून काढले जात आहे. हे क्षेत्र खूप वेगळे आहे आणि सामान्यत: मानवी उपस्थितीपासून वंचित आहे. पक्ष्यांसाठी हे एक चांगले ठिकाण मानले जाते.
दरम्यान तलावाच्या परिसरात झाडांच्या मागे आठ-दहा लोक लपलेले पाहून पिंपरकर आणि त्यांच्या मित्रांना धक्का बसला. त्यांचा हेतू संशयास्पद वाटल्याने चौकशी केली असता ते कंत्राटदाराची माणसे असून अवैध मासेमारीपासून तलावाचे रक्षण करण्यासाठी गस्त करीत असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याचे पिंपरकर म्हणाले.
नागपूर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार म्हणाले, परिसरात एक वाघीण आणि दोन शावक आहेत. विभागातर्फे कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत आणि गस्त वाढवली आहे. वाघिणीचा धाेका लक्षात घेत लोकांनीही शक्यतो वाघाच्या दर्शनासाठी परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. उल्लेखनीय म्हणजे नाेव्हेंबर २०१९ मध्ये अशाचप्रकारे मिहान परिसरात वाघाचे दर्शन घडले हाेते.