नागपूर : दाबेली खाण्याच्या इच्छेपोटी एका टिंबर व्यापाऱ्याला ५ लाख रुपये गमवावे लागले आहे. लकडगंज येथे सोमवारी सायंकाळी बरबटे उद्यानाजवळ ही घटना घडली.
सूर्यनगर येथील निवासी केतन पटेल यांना सोमवारी त्यांच्या भावाने ५ लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले. केतनने पैशांची बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली व ते बँकेकडे निघाली. बरबटे उद्यानाजवळ दाबेली खाण्याची इच्छा झाल्याने केतन तेथे थांबले. दुचाकी पार्क करून दाबेली खाण्यात ते व्यस्त असताना दोन तरुणांनी डिक्कीतून बॅग लंपास केली. पाच ते सात मिनिटांत केतन दुचाकीजवळ आले असता त्यांना बॅग आढळली नाही. त्यांनी तत्काळ लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्हीची तपासणी केली असता दोन तरुण संशयितरित्या उभे असल्याचे आढळले. लकडगंज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी अशाच पद्धतीने सदर ठाण्याच्या हद्दीत वन विभागाचे राऊंड अधिकारी रमेश आदमने यांच्या मोटारसायकलवरून पाच लाख रुपये लंपास करण्यात आले होते. सहा दिवसांत ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे.