लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे प्रवासी आपले साहित्य कुलींना देणे टाळत आहेत. अशास्थितीत कुलींना काम मिळत नसून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर सध्या १४५ कुली दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत. एका शिफ्टमध्ये ७२ कुली काम करतात. सध्या कोरोनामुळे प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. प्रवाशांचा कमी प्रतिसाद असल्यामुळे रेल्वेगाड्याही रद्द करण्यात येत आहेत. केवळ आवश्यक काम असलेले प्रवासीच प्रवास करत आहेत. परंतु, कोरोनाच्या धास्तीने ते कुलींकडे आपले सामान देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर कामासाठी आलेल्या कुलींना रिकाम्या हाताने घरी परतण्याची वेळ येत आहे. रोजगारच नसल्यामुळे घरगाडा कसा चालवावा, असा प्रश्न कुलींना पडला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रेल्वे प्रशासनाने अशा कठीण परिस्थितीत कुलींना मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवासी कोरोनामुळे कुलींना काम देण्याचे टाळत आहेत. यामुळे कुलींना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागत आहे. त्यामुळे कुलींवर उपासमारीची वेळ आली आहे.
- अब्दुल माजिद खान, अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे भारवाहक संघ