नागपूर : विजय वडेट्टीवार सध्या विरोधी पक्षनेते आहेत. पण काही काळानंतर त्यांना भाजपमध्ये न्याय मिळेल, तेव्हा त्यांना कळेल भाजप किती न्याय देते. ते भाजपमध्ये येतील असे आपल्याला म्हणायचे नाही पण प्रत्येक गोष्टीचा निर्णय काळ करत असतो. वडेट्टीवारांना माझी ऑफर नाही, पण एखादवेळी काळ असा येईल की त्यांना भाजप चांगली वाटेल, असा सूचक चिमटा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी घेतला.
नागपुरात शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना बावनकुळे म्हणाले, - राजकारणात पारिवारिक संबंध कधीही वेगळे नसतात. राजकारण राजकारणाच्या जागी असते. पक्ष पक्षाच्या जागी असतो. व्यक्तिगत जीवनात पारिवारिक संबंध कायम राहिले पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजकारणात कुणी कोणाचा परमनंट शत्रू किंवा मित्र नाही. राजकारणात दिवस आणि पक्ष बदलत असतात त्यामुळे विजय वडेट्टीवार हे आज ना उद्या भाजपला चांगलं म्हणतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांच्या यात्रेवर आपल्याला टीका करायची नाही. त्यांचा पक्ष आहे, त्यांनी यात्रा काढावी. सत्तेत असताना युवकांना रोजगार, प्रबोधन करण्यासाठी अडीच वर्ष संधी असताना त्यांनी यात्रा काढली नाही. सरकार असताना युवा यात्रा काढली असती आणि युवकांना काही दिले असते तर बरं झाले असते. आता ही यात्रा राजकारणाची आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजप निवडणुकीसाठी तयार
- महापालिकेत प्रशासक कोणामुळे आहेत. उद्या निवडणूक लागावी अशा मताची भाजप आहे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळाला. केव्हाही निवडणूक लागली तरी भाजप निवडणुकीला तयार आहे, असा दावाही बावनकुळे यांनी केला.