नागपूर : मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अंत्यसंस्कारात आलेले आप्तेष्ट परतत असताना तिरडीला तोडतात आणि बांबू घाटाच्या कोपऱ्यात फेकून देतात. घाटावरील कर्मचारी अस्ताव्यस्त पडलेले बांबू बरेचदा जाळून टाकतात, त्यामुळे प्रदूषणात अजून भर पडते आणि बहुमूल्य बांबूही व्यर्थ जातात; पण तिरडीच्या बांबूने स्मशानघाटाचे सौंदर्यीकरण होऊ शकते, अशी कल्पना पर्यावरणप्रेमी विजय लिमये यांना सूचली आणि अवघ्या सहा महिन्यात अंबाझरी घाटावर त्यांनी प्रत्यक्षात उतरविली.
इको फ्रेंडली लिव्हींग फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष असलेले विजय लिमये यांनी सर्वप्रथम शहरातील सर्व घाटांवरील कर्मचाऱ्यांना तिरडीचे बांबू जाळू नका, ते गोळा करून ठेवण्याची विनंती केली. घाटावर गोळा झालेले ७०० च्या जवळपास बांबू त्यांनी अंबाझरी घाटावर आणले. या बांबूपासून घाटाचे सौंदर्यीकरण कसे करता येईल म्हणून मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्रातून काही कारागीरांना नागपुरात आणले. अंबाझरी घाटावर प्रायोगिक तत्त्वावर या कलावंतांकडून विविध आकर्षक वस्तू तसेच घाटावरील रस्त्याच्या बाजूचे कठडे बनवण्यास सुरुवात केली आहे. घाटावर बांबूच्या कठड्यांची छान मांडणी केली. त्याला पेंटींग केल्यावर घाटाचा लूक बदलल्यासारखा दिसतोय.
- घाटावर पसरणार सुगंध
जिथे फुलपाखरे व मधमाश्या खूप जास्त असतात, तिथले वातावरण शुद्ध असते हे प्रमाण आहे. त्यासाठी अंबाझरी घाटावर विविध फुलझाडे, तसेच वेली लावण्यात येतील, त्यामुळे फुलपाखरांची तसेच मधमाश्यांची संख्या निश्चित वाढलेली दिसेल. घाटावरील दुर्गंधी नाहिशी करण्यासाठी सुगंधी फुलझाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच घाटावर पक्ष्यांचा वावर वाढविण्यासाठी फळझाडे लावण्यात येणार आहेत.
- स्मशानघाटाशी निगडित अनेक सामाजिक कामे आम्ही गेल्या दहा-बारा वर्षांपासून करीत आहोत. बांबूपासून अतिशय सुरेख वस्तू बनवता येतात, तसेच विविध आकार देऊन आसपासचा भाग सुशोभीत करता येऊ शकतो. हे शासनाला तसेच जनतेला दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- विजय लिमये, अध्यक्ष, इको फ्रेंडली लिव्हींग फाउंडेशन