कमलेश वानखेडे नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा दर्शन कॉलनीच्या मैदानावर आटोपल्यानंतरही काँग्रेस- भाजपमधील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. सभेनंतर सोमवारी भाजपने मैदानावर गोमुत्र शिंपडत शुद्धीकरण केले. तर मंगळवारी काँग्रेसने मैदानाशेजारी सद्बुद्धी यज्ञ करीत भाजपवाल्यांना सद्बुद्धी यावी, अशी प्रार्थना केली.
वज्रमुठ सभेसाठी दर्शन कॉलनीचे मैदान देण्यावरून राजकीय वातावरण तापले होते. वाद न्यायालयापर्यंत झाला. मात्र, त्यानंतरही जंगी सभा झाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. अशातच सभेनंतर सोमवारी स्थानिक नागरिक मैदान बचाव समिती आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाची स्वच्छता करून गोमूत्र शिंपडून मैदानाचे शुद्धीकरण ही केले होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्तेही सरसावले. प्रत्युत्तर देत भाजपवाल्यांना सद्बुद्धी यावी म्हणून मैदानाजवळच सद्बुद्धी यज्ञ केला.
या यज्ञात विजय वनवे, हरीश रामटेके, दिलीप तुपकर, महेंद्र कटाने, महेश ठाकरे, चंदू वनवे, आशीष बडनखे, भास्कर कायरकर, राजू अदमाने, प्रशांत तिडके, मोहन विश्वकर्मा, प्रशांत ढोक, सतीश भूरे, भैय्या शरणागत, राजेश बंदबुचे, प्रवीण बुर्ले, सुभाष गायकवाड, हरिभाऊ बनायेथ, प्रदीप धोटे, बाला साखरकर, मनोज राणे आदी सहभागी झाले होते.