लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगात दरवर्षी ६ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, २०३० पर्यंत ही संख्या वाढून ८ दशलक्षपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भारतात ४० टक्के लोक तंबाखू खातात, २० टक्के लोक सिगारेट ओढतात तर १४ टक्के लोक बिडी ओढतात. तंबाखूच्या घातक परिणामामुळे भारतात सर्वाधिक मानेचा व घशाचा कर्करोग आढळून येतो. या सोबतच मुखाचा, फुफ्फुसांचा, अन्ननलिकेचा, मूत्रनलिकेचा कर्करोगासह ‘क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ आणि हृदय व हृदय रक्तवाहिनीसंबंधातील आजार सर्वाधिक आढळून येतो. हे टाळण्यासाठी तंबाखूला दूर ठेवणे हाच एक पर्याय आहे, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुब्रजित दासगुप्ता यांनी येथे व्यक्त केले३१ मे हा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सहसंचालक डॉ. बी. के. शर्मा, डॉ. करतार सिंह, डॉ. एस. सप्रे, डॉ. छांगाणी आदी उपस्थित होते. डॉ. दासगुप्ता म्हणाले, तंबाखूमधील सर्वाधिक घातक बिडीचे व्यसन असून याचा परिणाम थेट फुफ्फुसांवर होतो. २०११ मध्ये या व्यसनामुळे ५.८ लोकांचा मृत्यू झाल्याचे सामोर आले आहे. तंबाखूच्या रोगामुळे दरदिवशी अंदाजे २५०० लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमधून जेवढा महसूल मिळतो त्यापेक्षा कितीतरी खर्च रुग्णाच्या उपचारात होतो. यामुळे सरकारने याबबत गंभीरतेने विचार करावा, असे मतही डॉ. दासगुप्ता यांनी मांडले.मुख कर्करोग रुग्णांची संख्या वाढतेयआरएसटी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये २०१४ ते २०१६ या तीन वर्षातील गंभीर रुग्णांची नोंद थक्क करणारी आहे. २०१४ मध्ये ३०७१ कर्करोगाच्या गंभीर रुग्णांमध्ये मुख कर्करोगाचे ७७२ तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचे १७३ रुग्ण आढळून आले. २०१५ मध्ये ३२३६ गंभीर रुग्णांमध्ये ८८० मुखाचे तर फुफ्फुस कर्करोगाशी संबंधित १२६ रुग्णांची नोंद झाली.२०१६ मध्ये ३१६१ गंभीर रुग्णांमधून ९३६ मुख कर्करोगाचे तर फुफ्फुस कर्करोगाचे ११३ रुग्ण आढळून आले. या तीन वर्षांत मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.आज तंबाखूविरोधी रॅलीआरएसटी कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने गुरुवारी जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात सकाळी ८ वाजता रुग्णालयातून निघणाऱ्या तंबाखूविरोधी रॅलीने होईल, अशी माहिती डॉ. बी. के. शर्मा यांनी दिली.