लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊननंतर अनलॉकच्या पहिल्याच दिवशी एसटीच्या १५० बसेस रस्त्यावर धावणार आहेत, परंतु लांब पल्ल्याच्या बसेस सध्या बंदच ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
लॉकडाऊनमध्ये एसटीच्या केवळ २५ ते ३५ बसेस धावत होत्या. त्यातही आवश्यक कारणासाठी प्रवास या अटीमुळे प्रवाशांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर हळूहळू बसेसची संख्या ६० वर गेली. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर अनलॉकच्या पहिल्याच दिवशी एसटी महामंडळाने १५० बसेस चालविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार तालुका ते तालुका आणि जिल्हा ते जिल्हा अशा बसेस चालविण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी ७ वाजेपासून एसटी बसेसची वाहतूक सुरळीत सुरू होणार आहे. परंतु लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याचा निर्णय अद्याप एसटी महामंडळाने घेतलेला नाही. त्यामुळे पुणे, औरंगाबाद, सोलापूर येथे एसटी बसेस बंद राहणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार एसटीची वाहतुक सुरू राहणार असल्याची माहिती एसटीच्या नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली आहे.
शिवशाही होणार सुरू
मागील अनेक दिवसांपासून बंद असलेली शिवशाही बस अनलॉकमध्ये सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. परंतु सध्या भंडारा, अमरावती या मार्गावरच शिवशाही बसेस धावणार आहेत. शासनाच्या निर्देशानंतर इतर ठिकाणी शिवशाही बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
...........