लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रेक द चेनअंतर्गत राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशाच्या पाठोपाठ जिल्हा व मनपा प्रशासनानेही कोविड प्रोटोकॉलसंदर्भात नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार १५ ऑगस्टपासून नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.
नव्या आदेशानुसार दुकान, शॉपिंग मॉल, रेस्टाॅरंट आता सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तसेच सामाजिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनासुद्धा रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. परंतु यात सभागृहातील क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० लोक, अशी अट राहील. नवीन निर्देशांतर्गत लग्नसमारंभाच्या आयाेजनात काहीसा दिलासा मिळाला आहे. आता मंगल कार्यालयात लग्नसमारंभ असेल तर क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० लोकांना परवानगी राहील, तर लॉनमध्ये होणाऱ्या लग्नात २०० लोक उपस्थित राहू शकतील. इन्डोअर व आऊटडोअर खेळांनाही हिरवी झेंडी मिळाली आहे. अंत्यविधीमध्ये आता २० ऐवजी ५० लोक सहभागी होऊ शकतील. त्याचप्रकारे मनोरंजन पार्क व बोटिंगही नियमित करण्यात आली आहे. व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर व योगा सेंटर ५० टक्के क्षमतेसह रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येेतील. धार्मिक स्थळ, स्वीमिंग पूल व कोचिंग क्लासेस मात्र बंदच राहतील. शाळा-महाविद्यालयांबाबत राज्य सरकारच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.