लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ व लोकमतद्वारे आयोजित मध्य भारतात प्रसिद्धीस आलेल्या नागपूर दुर्गा महोत्सवाचे बुधवारी सायंकाळी ७ वाजता उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार तसेच लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार आहेत. नागपूर दुर्गा महोत्सवात यावर्षी भव्य पाणबुडी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीनगरात नागपूर दुर्गा महोत्सव साजरा करण्यात येतो आहे. गेल्या वर्षी आयोजकांनी मेट्रो रेल्वेची प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधले होते. जवळपास १० लाखावर भाविकांनी मातेचे दर्शन घेतले होते. यावर्षी ८० फुटाची पाणबुडी आणि मातेच्या स्थापनेसाठी तयार करण्यात आलेली समुद्री गुफा लक्ष वेधून घेत आहे. सोबतच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनातील दुर्मिळ असे छायाचित्र आणि माहिती देणारे प्रदर्शनसुद्धा लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटनसुद्धा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी होणार आहे. त्याचबरोबर येणारे १० दिवस विविध सांस्कृतिक, धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे. यात महागरबा, महिला व बाल कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम. सोनिया परचुरे व त्यांच्या टीमचा ‘द म्युझियम’, सनशाईन फाऊंडेशनतर्फे फॅशन शो, सारेगमप फेम मौली दवे यांचा बॉलिवूड हंगामा, विनोदी नाटक हसवा फसवी, संजीवनी भेलांडे यांचा सूर संजीवनी, दसरा मिलन समारंभ आदी साजरे करण्यात येणार आहेत.
समुद्री गुहेचा सेट विशेष आकर्षणसंपूर्ण नागपुरात या महोत्सवाची जोरदार चर्चा आहे. भव्य पाणबुडी बघण्यासाठी अनेकांनी मंडळाला भेटसुद्धा दिली आहे. आकर्षक रोषणाई, मनमोहक साजशृंगार केलेली मातेची मूर्ती आणि भव्यदिव्य समुद्री गुहेचा सेट, त्याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल त्यामुळे यंदाही लक्ष वेधून घेणारा नागपूर दुर्गा महोत्सव ठरणार आहे.