नागपूर : सद्यस्थितीत जे काही सुरू आहे ते सत्ताकारणच आहे. नेत्यांनी खरे तर सेवाकारण, विकासकारण आणि समाजकारणावर भर दिला पाहिजे. आजच्या काळात राजकारणाची व्याख्या बदलण्याची खरोखरच गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात ते एकल महाविद्यालयासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
नेत्यांनी खरे तर गरीब जनतेचा विकास होईल, त्यांचे भले होईल ही बाब डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले पाहिजे. असे राजकारण विकासाशी जोडलेले असते. विदर्भाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने सुसह्य करणे आणि एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठीच कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थांना सर्व स्तरांतून सहकार्य झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात सुरू असलेल्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. या वर्गात १०१६ शिक्षक आणि १२४ पर्यवेक्षक अशी एकूण १ हजार १४० मंडळी सहभागी झाली आहे. २७ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव राजीव हडप, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर, सदस्य धनंजय बापट, सुधीर दिवे, डॉ. सी.डी. मायी यांची उपस्थिती होती.
गरज पडली तर शासकीय शिक्षकांना सहकार्यअनेक गावांमध्ये जिल्हा परिषद किंवा इतर शासकीय शाळाच्या शिक्षकांना प्रशिक्षण किंवा सहकार्याची आवश्यकता असते. कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून अशा शिक्षकांना आवश्यकता भासली तर निश्चितच सहकार्य करण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले. एकलव्य एकल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्य असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.