लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज अश्विन दर्श अमावस्या, सामान्यत: अमावस्या हा अशुभ दिवस सांगितला आहे. पण याला अपवाद या अमावस्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे. पण तो सर्व कामांना नाही, म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरेल.प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी म्हणजे वर सांगितलेल्या वेळेस लक्ष्मी विष्णू व कुबेर यांची पूजा असा या दिवसाचा विधी आहे. लक्ष्मीपूजन करताना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदळ कमळ किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा किंवा यंत्र ठेवून पूजा करावी. शास्त्रानुसार देवतांना लवंग, वेलची व साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाचा, खव्याचा नैवेद्य दाखवावा. धने, गुळ, साळीच्या लाह्या, बत्तासे आदी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते प्रसाद म्हणून वाटावेत.बुधवारी प्रदोषकाळ सायंकाळी ५.४२ ते ८.०२, लाभवेळ सायंकाळी ५ ते ६.३० व शुभवेळ रात्री ८ ते ९.३०, अमृतवेळ ९.३० ते ११ असून स्थिर लग्न वेळ सायंकाळी ६.११ ते रात्री ८.१० आहे. यापैकी कोणत्याही वेळेत लक्ष्मीपूजन केले असता लक्ष्मी स्थिर राहील. परंतु सर्वोत्तम वेळ प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी ५.४२ ते ८.०२ अशी आहे. लक्ष्मीपूजनाचा हा दिवस सकारात्मक राहील. ठरविल्याप्रमाणे कामे करण्यास अनुकूलता राहील. मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, धनु, मकर व कुंभ व्यक्तींना चांगले परिणाम लाभतील. काळसर व हिरव्या रंगाच्या छटा प्रभावशाली राहतील. कफप्रकृती असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाली, व्यावसायिक घडामोडी यासाठी अनुकूलता राहील. दिवसाकधीतरी ‘ओंम गणपतेय नम:’ ऐका. दिवसावर ८ ते ० या अंकाचे वर्चस्व राहील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.बलिप्रतिपदा दिवाळी पाडवाकार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा, वहीपूजन, अन्नकूट, गोवर्धन पूजन साजरे करतात. हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. हा दिवस सर्वसामान्य कामास शुभ आहे. पाटावर बलीची प्रतिमा पांढऱ्या तांदळाने काढून त्याची पूजा करावी. या दिवशी स्त्रियांनी पतीला अभ्यंगस्नान घालावे. नव्याने खरेदी केलेल्या जमाखर्चाच्या वहीचे पूजन करावे. पिवळ्या रंगाचा विशेष उपयोग व्हावा. वहीपूजनाचा मुहूर्त सकाळी ६.३० ते ८ व ९.३० ते दुपारी ३.३० राहणार असल्याचे ज्योतिषाचार्यांनी सांगितले.