लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब ऊर्फ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला शुक्रवारच्या 'महाराष्ट्र बंद' नागपूरसह जिल्ह्यात शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी दिली.शहरातील विधानसभानिहाय व शहर कार्यकारिणीची संयुक्त बैठक गुरुवारी झाली. त्यात बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदला शहरातील राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. बंद दरम्यान शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा हुडदंग न करता, कोणत्याही प्रकारे सामान्य जनतेला, व्यापारी वर्ग, शासकीय अथवा खाजगी मालमत्ता याला नुकसान होणार नाही तसेच कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन हा बंद संवैधानिक मार्गाने यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.या बंदला एआयएमआयएम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन ऑटो संघटना, नागपूर फेरीवाला दुकानदार संघ, भारतीय मुस्लिम परिषद, शिवशाही व्यापारी संघ आदी संघटनांचे समर्थन प्राप्त आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष रवी शेंडे, इंजि. राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र बंदची हाक घटनाबाह्य : अॅड. मुकुंद खैरेवंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सीएए व एनआरसी विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अॅड. आंबेडकर यांची बंद पाळण्याची ही भूमिका घटनाबाह्य असल्याची टीका बुद्धिस्ट कायद्यासाठी लढा देणारे अॅड. मुकुंद खैरे यांनी केली आहे. केंद्र शासनाने आणलेल्या सीएए व एनआरसीला आमचाही विरोध आहे. मात्र त्यासाठी बंद पाळणे, रस्ते अडविणे व जाळपोळ करण्याला आम्ही समर्थन करणार नाही, अशी भूमिका अॅड. खैरे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणात बंद पाळणे, रस्ते अडविणे, जाळपोळ करणे अशाप्रकारची आंदोलने संविधानाला कमजोर करतात, असे संबोधले होते. त्यामुळे देशात अराजकता, बेबंदशाही निर्माण होते आणिसंविधानावरील लोकांचा विश्वास कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. बाबासाहेबांच्या भूमिकेविरोधात अॅड. प्रकाश आंबेडकरांची भूमिका असल्याची टीका अॅड. खैरे यांनी केली. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. असे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी अॅड. आंबेडकरांनी हा बंद पुकारलेला आहे, असाही आरोप अॅड. खैरे यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही तर संविधानाच्या विरोधात असून, हा कायदा भारतीय संविधानाचे ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘नागरिकत्व’ प्रकरण-२ चे उल्लंघन करतो. त्यामुळे हा संविधान विरोधी कायदा रद्द करण्यासाठी नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाला पोस्टकार्डद्वारे निवेदन पाठवावे, असेही आवाहन अॅड. खैरे यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला प्रदीप फुलझेले, अजय डंबारे, चंद्रभागा पानतावणे उपस्थित होते.२६ ला सन्मान समारोहसंविधान संरक्षण मंचतर्फे येत्या २६ जानेवारीला संविधान सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता संविधान चौक येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. के.जे. रोही व भारतीय संविधानाचे अध्यक्ष अॅड. मुकुंद खैरे उपस्थित राहणार आहेत.