नागपूर : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने पवित्र दीक्षाभूमीवर ‘६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिना’चा मुख्य सोहळा मंगळवार ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा अनेक व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार तर अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई उपस्थित राहतील.दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणारे युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनिष्ट रूढी व परंपरेत अडकलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतली. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दर अशोक विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. शनिवारपासून सुरू झालेल्या या सोहळयाच्या तिसऱ्या दिवशी रविवार दीक्षाभूमीवर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच धम्मपरिषद घेण्यात आली. यावेळी भारतासह जपान, थायलंड, मलेशिया व इतरही देशातील आलेल्या बौद्ध भिक्खूंनी आपले विचार मांडले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धम्मदीक्षा विधी सोहळ्यात पाच हजारावर अनुयायांंनी धम्मदीक्षा घेतली.
दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा आज मुख्य सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 2:19 AM