लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉ. विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनच्यावतीने साहित्य पुरस्कारांचे वितरण मंगळवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात करण्यात आले. त्यावेळी, ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. किशोर सानप यांना ‘मल्हारराव काळे समीक्षा पुरस्कार’, डॉ. सदानंद देशमुख यांना ‘मीरादेवी पिंचा स्मृती लेखक पुरस्कार’, डॉ. भाऊ लोखंडे यांना ‘डॉ. गिरीश गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार’ आणि डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना ‘पुरुषोत्तम गाडगे स्मृती काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत तिडके, कार्याध्यक्ष श्रीराम काळे, अनिल हिरेखण आणि प्रेक्षकांमध्ये गिरीश गांधी उपस्थित होते.समाजात प्रत्येक गोष्टी माणूसकेंद्री आहेत आणि अशा माणसाचा विचार साहित्यिक करत असतात. माणूस वाचणे आणि माणुसकी वाचवण्याची प्रेरणा साहित्य देत असते. साहित्यिकांच्या सगळ्या विचारांच्या नद्या समाजहितकारी समुद्राला जाऊन मिळतात. वाचक व रसिकाला स्वत:बरोबर वाहून नेणारा प्रवाह म्हणजे साहित्यिक असल्याचे कुवळेकर यावेळी म्हणाले. प्रास्ताविक गजानन नारे यांनी केले. तर, संचालक रेखा दंडिगे-घिया यांनी केले.मराठीत विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुले - डॉ. मिर्झामराठीमध्ये विनोदी कवितांना भावच नाही. जणू, विनोदी कविता म्हणजे झेंडूची फुलेच असल्यासारखे समजले जाते. विनोदी कवितांना कधी गुलाबाची फुले होता आले नाही, अशी मराठी साहित्याची शोकांतिका डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी यावेळी विनोदी शैलीतच उलगडून दाखवली. हिंदीमध्ये मात्र विनोदी कवितांना प्रचंड भाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.