नागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या करीत कंपनी १८ फेब्रुवारीला सहावा स्थापना दिन साजरा करीत आहे. या निमित्ताने १८ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता दीक्षाभूमीसमोरील रामदासपेठ येथील मेट्रो भवनच्या गुंज सभागृहात स्थापना दिन समारंभ होणार आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन २१ ऑगस्ट २०१४ रोजी आणि २०१५ पासून नागपूर शहर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. वर्ष २०१५ ते २०२१ पर्यंतचा कार्यकाळ महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता मैलाचा दगड ठरला आहे. महामेट्रोतर्फे डिसेंबर २०२१ पर्यंत सेंट्रल एव्हेन्यू आणि कामठी रोडवर प्रवासी सेवा सुरू करण्याचा मानस आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी आणि सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगरपर्यंत मेट्रो मार्गावर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर मेट्रोच्या कामाची प्रशंसा महाराष्ट्रात सर्वच शहरात आणि अन्य राज्यांतही होत आहे. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. या टप्प्यात ६७०९ कोटींची गुंतवणूक, ४३.८ किमी लांब आणि ३२ मेट्रो स्टेशन राहणार आहेत.