उमरेड : जागाच मिळत नसल्याच्या कारणावरून अनेक दिवस रेंगाळलेल्या उमरेडच्या कोविड सेंटरसाठी नूतन आदर्श महाविद्यालयाने क्रीडा संकुलाचा हॉल उपलब्ध करून दिला. सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले आणि अखेर उद्या गुरुवारपासून उमरेडचे कोविड सेंटर कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत सुरू होणार आहे. बुधवारी डॉ. विशाल सवाईमुल यांच्या हस्ते फीत कापून या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार राजू पारवे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घरडे, तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार प्रमोद कदम, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एम. खानम्, दिलीप सोनटक्के, नगरसेवक सतीश चौधरी, रेणुका कामडी, विशाल देशमुख, उमेश हटवार, सुरज इटनकर, जितेंद्र गिरडकर, मनीष शिंगणे, रितेश राऊत, अमित लाडेकर, वैभव भिसे, विक्रांत मुळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत नगरपालिका, महसूल विभाग, तालुका आरोग्य विभाग यांच्या वतीने एकूण ८० बेड असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये एकाच वेळी सुमारे ४० रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची सुविधा आहे. डॉ. विशाल सवाईमुल, डॉ. महेश सदावर्ती, डॉ. एस.एम. निंबार्ते, डॉ. विराग बोरकर, डॉ. जगदीश तलमले सेवा प्रदान करणार आहेत. शिवाय दोन परिचारिकासुद्धा राहणार असून आम्ही अजून डॉक्टर आणि परिचारिकांच्या शोधात आहोत. कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची काळजी घेणार आहोत, असे मत डॉ. एस.एम. खानम यांनी व्यक्त केले. मातोश्री प्रभा सेवा संस्थेच्या वतीने १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन, १० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर आणि १० ऑक्सिमीटर तसेच अन्य साहित्य प्रमोद घरडे यांनी सोपविले. जनतेची सेवा करण्याची ही वेळ आहे. मी जिवंत असेल तर सेवा केलीच पाहिजे, असे मत प्रमोद घरडे यांनी व्यक्त केले. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी हे कोविड सेंटर उभारण्यासाठी भरपूर मेहनत घेतल्याचे मत नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया यांनी मांडले.
आरोग्य विभागावर १ कोटी
उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यासाठी १ कोटी रुपयांचा आमदार निधी आरोग्य विभागावर खर्च करणार असल्याचा शब्द आमदार राजू पारवे यांनी या वेळी दिला. २०० बेड आणि २०० सिलिंडर आमदार निधीतून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--
उमरेड येथील कोविड सेंटरला साहित्य प्रदान करताना प्रमोद घरडे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया आदी.