गांधीबाग बँक निवडणूक : जट्टेवार सभागृहात मतमोजणी, ३१८६ मतदान नागपूर : तब्बल १० वर्षांनंतर गांधीबाग सहकारी बँकेची चुरशीची निवडणूक रविवारी सक्करदरा चौक येथील विदर्भ बुनियादी हायस्कूल व महाविद्यालयात शांततेत पार पडली. या निवडणुकीत २०८५२ मतदारांपैकी केवळ ३१८६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी सोमवार, २३ जानेवारीला न्यू नंदनवन येथील जट्टेवार सभागृहात होणार आहे. बँकेची २०१२ ची निवडणूक बिनविरोध झाली होती. पण २०१७ मध्ये पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक झाली. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. निवडणूक जाहीर झाली तेव्हा बिनविरोध होण्याचे संकेत होते. पण पाच जणांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीत चुरस निर्माण झाली. विद्यमान पॅनलचे वरिष्ठ नेते कामाला लागले. सर्वांनी मतदारांशी संपर्क साधून मतदार करण्याचे आवाहन केले. १९ संचालकांच्या निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान पॅनलचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यात महिला गटात दोन, एसटी आणि व्हीजे-एनटी गटात अनुक्रमे १-१ संचालकाचा समावेश आहे. ओबीसी गटात एक संचालकाच्या निवडीसाठी भूषण दडवे यांनी अर्ज दाखल केला होता. याशिवाय सर्वसाधारण गटात १४ संचालकांच्या निवडीसाठी विद्यमान पॅनलचे १४ उमेदवार रिंगणात होते. याशिवाय विरोधी पॅनलचे विलास हरडे, भूषण दडवे, सुभाष मुसळे आणि भैयालाल ताकोटे या चार उमेदवारांनी अर्ज भरला होता. वरिष्ठ सहकार नेते रवींद्र दुरुगकर यांच्या नेतृत्वात विद्यमान पॅनलने निवडणूक लढविली. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पूर्वी विद्यमान पॅनलच्या नेत्यांनी प्रयत्न केले. निवडणूक झाल्यास बँकेवर २० लाख रुपयांचा भुर्दंड येईल, असे सांगितले जात होते. अखेरच्या दिवसापर्यंत विरोधी पॅनलचे सर्व उमेदवार अर्ज मागे घेतील, असे विद्यमान पॅनलच्या नेत्यांचे मत होते. दबाव तंत्राला बळी पडणार नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. दुरुगकर यांनी आपल्या मुलाला विद्यमान पॅनलनमध्ये स्थान देण्यास विरोधी पॅनलचा विरोध होता. पण संकेतला सहकार खात्याचा अनुभव असल्यामुळे उमेदवारी दिल्याचे दुरुगकर यांनी सांगितले होते. बँकेचे वरिष्ठ नेते निवडणूक बिनविरोध करून बँकेच्या २०८५२ सभासदांचा मतदानाचा हक्क डावलत असल्याचा आरोप विरोधी पॅनलने करून निवडणुकीत आव्हान उभे केले होते. निवडणुकीत विजयी कोण ठरणार, हे सोमवारी मतमोजणीनंतरच कळणार आहे.(प्रतिनिधी)
चुरशीच्या लढतीचा आज फैसला
By admin | Published: January 23, 2017 2:08 AM