लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका एका ‘डे’ची पायरी चढत हा आठवडा ‘व्हॅलेंटाईन डे’कडे मार्गक्रमण करतो आहे. ‘रोझ डे’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘प्रपोज’ करत, प्रेमाने ‘चॉकलेट’ भरवत, हे दिवस कायम स्मरणात राहावे म्हणून छानसा ‘टेडी’ भेट देऊन हा ‘डे’क्रम महत्त्वाच्या विषयापर्यंत येऊन पोहोचला आहे. माणूस स्पर्धेत गहाळ झाला, रोजच्या व्यस्ततेत भावनाविरहित झाला आणि म्हणून स्वत:वरचा विश्वासही हरवून बसला. जो स्वत:कडे अविश्वासाने बघतो, तो दुसऱ्याला कशी किंमत किंमत देईल? हीच किंमत, विश्वास, भावना जपून ठेवण्याचा क्षण म्हणजे एकमेकांना आणि स्वत:ला द्यावयाचे ‘वचन’ होय! स्वत:साठी आणि इतरांसाठी वेळ नाही म्हणून उत्सव साजरे करणाºया ‘डे’संस्कृतीमध्ये एका दिवसासाठीच का होईना, ही ‘डे’संस्कृती महत्त्वाची ठरतेय. तर आज ‘व्हॅलेंटाईन वीक’मधला एकमेकांना आणि स्वत:लाही विश्वास देणारा ‘प्रॉमिस डे’.‘प्राण जाय पर वचन ना जाय’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. प्रत्येक वर्ग ही म्हण त्या त्या प्रसंगात आणि त्या त्या परीने पूर्ण करण्याचे प्रयत्न करतो. या म्हणीला प्रचंड मोठा इतिहास आहे. मात्र, वर्तमानात ही म्हण स्वप्नवत ठरताना दिसते. प्रेम या संवेदनेचा तर बाजार झालाय, मग ते कोणतेही का असेना! वचन दिले जाते ते केवळ मोडण्यासाठीच, अशी आजची धारणा झाली आहे. वैयक्तिक पातळीवर सोडाच, आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘वचनभंग’ सर्रास होताना दिसतात. आपल्याकडे ‘महाभारत’, ‘रामायण’ हे पौराणिक इतिहास वचनभंगामुळेच घडलेले दिसून येतात तर अलीकडे पहिले व दुसरे महायुद्धसुद्धा वचनभंगाचाच परिणाम आहे आणि वर्तमानातही प्रत्येक देश एकमेकांना पाण्यात बघतो, त्याचे कारणही वचनभंगाची भीतीच! अशा स्थितीत युवावर्ग पुन्हा एकदा ‘वचन’ ही संज्ञा जनमानसात स्थापित करू शकतो. मग ते प्रणयाचे, मैत्रीचे का असेना, हा विश्वास वचनातूनच प्राप्त होऊ शकतो. एकमेकांचा आत्मविश्वास वाढविणारी वृत्ती म्हणजे वचन. पर्यावरणाची हानी वाचविण्यासाठीसुद्धा घ्यावयाचे आहे, ते वचनच. काय मग घेणार ना एकमेकांकडून वचन म्हणजेच तुमचा-आमचा ‘प्रॉमिस’!
आज 'प्रॉमिस डे' : देऊ एकमेका वचन प्रेमोत्सर्जनाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:39 AM