लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे एक हजार लाभार्थींनी व्यक्तिगत शौचालय बांधण्यासाठी महापालिकेकडून अनुदानाचा पहिला हप्ता उचलला. मात्र शौचालयाचे बांधकाम केले नाही. अशा लाभार्थींचा सर्वे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. यात ७५ लाभार्थीनी अनुदानाचा पहिला हप्ता उचलला पण शौचालयाचे बांधकाम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या लाभार्थीच्या विरोधात आरोग्य विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत व्यक्तिगत शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुक्रमे ४ हजार व ८ हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच महापालिकेकडून अतिरिक्त ४ हजारांची रक्कम दिली जाते. अशा प्रकारे शौचालय बांधकामासाठी लाभार्थीला १६ हजार रुपये मिळतात. या योजनेला लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार २४,१३० अर्ज प्राप्त झाले. पडताळणीनंतर १३,३८३ अर्ज पात्र ठरले. पात्र अर्जधारकांना अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून ८ हजार रुपये अनुदान देण्यात आले. हप्ता दिल्यानंतर शौचालयाचे बांधकाम सुरू केले की नाही याची पडताळणी करण्यासाठी तपासणी करण्यात आली. यात १२०१ लाभार्थींनी अद्याप शौचालयाचे बांधकाम सुरू केलेले नाही. १२२९७ लाभार्थींनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. बांधकाम केलेल्या लाभार्थींना अनुदानाचा दुसरा ८ हजारांचा हप्ता देण्यात आला.ज्या लाभार्थींनी पहिला हप्ता उचलला पण अद्याप शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात केलेली नाही त्यांना विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली. बहुसंख्य लाभार्थींनी समाधानकारक खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिकेतीली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सूत्राच्या माहितीनुसार झोन स्तरावरील अभियंता, कनिष्ठ अभियंता व झोन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे.आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक प्रकरणेशौचालय बांधकामात शासकीय अनुदानाचा दुरुपयोग केल्याचे सर्वाधिक प्रकरणे आसीनगर झोनमधील आहेत. येथील ५३ लाभार्थीच्या विरोधात तक्रार केली आहे. शौचालयाऐवजी स्टोर रुमचे बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. धंतोली झोनमधील तकिया भागातील लाभाथींनी पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर शौचालय बांधकाम करणार असल्याचे सांगितले. आमच्याकडे शौचालय बांधकामासाठी पुरसे पैसे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.