नागपूर : सध्या टाेमॅटाेचे दर कमालीचे काेसळल्याने पाच ते सात रुपये प्रतिकिलाे दराने एकमुस्त विकावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दुसरीकडे, शहरातील आठवडी बाजारात १२ ते १५ रूपये तर दारावर २० रूपये प्रतिकिलाे दराने टाेमॅटाे खरेदी करावे लागत आहे. उत्पादक आणि शहरी ग्राहकांना मिळणाऱ्या टाेमॅटाेच्या दरात माेठी तफावत असल्याचे दिसून येते.
मागील काही दिवसात टाेमॅटाेची बाजारातील आवक वाढल्याने तसेच मागणी स्थिर असल्याने टाेमॅटाेचे दर काेसळले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ग्रामीण अथवा शहरातील आठवडी बाजारात टाेमॅटाे विकायचे झाल्यास किमान १२ ते १५ रूपये दर मिळताे. मात्र, बाजारात टाेमॅटाेची आवक वाढत असल्याने बाजाराची संरचना थाेडी विस्कळीत हाेते आणि दर काेसळतात. त्याचा फटका टाेमॅटाे उत्पादकांना बसताे.
आवक वाढल्याने कळमना (नागपूर)सह जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये इतर भाजीपाल्याच्या तुलनेत टाेमॅटाेला सध्या कमी दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून, याला व्यापाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. टाेमॅटाे नाशिवंत असल्याने तसेच भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या टाेमॅटाेवर प्रक्रिया करणे शक्य नसल्याने त्याला तातडीने मिळेल त्या दरात विकावे लागते किंवा कुणी खरेदी न केल्यास उघड्यावर फेकावे लागते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
बाजार समित्यांमध्ये सरासरी ४ रूपये दर
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात टाेमॅटाे विकायचे झाल्यास किमान ३ आणि कमाल ८ रूपये प्रतिकिलाे दर मिळताे. गुरुवारी (दि. २३) कळमना (नागपूर) बाजार समितीत ८ रूपये, कामठी ५ रूपये, कळमेश्वर ७ रूपये तर रामटेक बाजार समितीत सरासरी ३ रूपये प्रतिकिलाे दराने टाेमॅटाेची विक्री करण्यात आली, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
घरासमोर २० रूपये किलो
बाजार समित्यांमध्ये टाेमॅटाेचे दर कमी असले तरी शहरातील आठवडी बाजारात टाेमॅटाेचे दर प्रतिकिलाे १२ ते १५ रूपये असून, नागपूर शहरात दारावर टाेमॅटाे खरेदी करावयाचे झाल्यास प्रतिकिलाेला २० रूपये माेजावे लागतात, अशी माहिती काही गृहिणींनी दिली. हीच अवस्था तालुक्याच्या ठिकाणी असून, तेथील व गावांमधील गृहिणी दारावर टाेमॅटाे खरेदी करण्यापेक्षा आठवडी बाजारातून खरेदी करण्यावर अधिक भर देतात.
उत्पादन खर्च दूरच, वाहतूक खर्चही निघेना
यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे टाेमॅटाेवर कीड व राेगाचा प्रादुर्भाव झाला हाेता. त्यातून पीक वाचविण्यासाठी महागड्या कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागल्याने उत्पादन खर्च वाढला. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने वाहतूक खर्चातही माेठी वाढ झाली आहे. मात्र, तुलनेत दर मिळत नसल्याने टाेमॅटाेचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी मार्च ते मे महिन्यात भाजीपाल्याला चांगले दर मिळतात. त्याअनुषंगाने टाेमॅटाेची लागवड केली. मात्र, यावर्षी बाजारात आवक वाढल्याने दर काेसळले. त्यामुळे टाेमॅटाे फेकून देण्याची वेळ आली आहे.
- विनायक वाडबुदे, शेतकरी.
भाजीपाल्याच्या दरात नेहमीच चढउतार असते. त्यामुळे कधी चांगला दर मिळताे तर कधी कवडीमाेल दराने विकावा लागताे. शिवाय, हवामानातील बदल उत्पादन व दर प्रभावित करते.
- ओम खाेजरे.