नागपूर : पावसामुळे टोमॅटोसह सर्वच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो आणि हिरवी मिरची १५० रुपये किलो आहे. याशिवाय दोडके, ढेमस, शेंगा, फूल कोबी, कारले आणि अन्य भाज्या ६० ते ८० रुपये किलो विकल्या जात आहेत. वाढत्या भावामुळे गृहिणी संतप्त असून, त्यांचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट वाढले आहे.
कळमना युवा सब्जी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद भैसे म्हणाले, एक महिन्याआधी आलेल्या पावसामुळे अद्रक आणि लसणाचे भाव वाढले आहेत. एक महिन्याआधी किरकोळमध्ये कोथिंबीर १०० रुपये, टोमॅटोचे भाव ६० रुपये होते. पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. आवक फारच कमी असल्याने भाव तेजीत आहेत. या दरवाढीमुळे गृहिणींनी काही भाज्यांकडे पाठ फिरविली असून, कडधान्याचा उपयोग करीत आहेत. उपबाजार कॉटन मार्केटमध्ये नागपूर जिल्ह्याच्या काही भागातून आवक सुरू आहे.
टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीच्या विक्रीत घसरण
महाल, झेंडा चौक आणि सोमवारी क्वार्टर बाजारातील विक्रेते म्हणाले, शेंगा, वांगे, फूल कोबी, पत्ता कोबी, पालक, चवळी भाजीचे भाव आवाक्यात आहेत. अन्य भाज्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे लोकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. याशिवाय गुंतवणूक वाढल्यामुळे या व्यवसायात जोखीम वाढली आहे. भाज्यांची विक्रीची चिंता असते. अनेकदा तोटा सहन करावा लागतो. टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची विक्री कमी झाली आहे.
टोमॅटोची कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आवक
नागपुरात छत्तीसगड, मदनपल्ली (आंध्र प्रदेश) आणि बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक होते. संगमनेर, नाशिक, छिंदवाडा, बुलढाणा, औरंगाबाद येथून होणारी आवक सध्या बंद आहे. याशिवाय स्थानिक शेतकऱ्यांकडे टोमॅटो उपलब्ध नाहीत. हिरवी मिरची बुलढाणा येथून येत आहे. पावसामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. अनेक घटकांचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. कोथिंबीरची सर्वाधिक आवक मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून होते. या भागातही पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.
स्वयंपाकघरात डाळींचा जास्त उपयोग
भाज्यांच्या वाढत्या किमतीवर गृहिणींनी उपाय शोधला आहे. भाजीपाल्याकडे कानाडोळा करीत स्वयंपाकघरात प्रथिनांचा खजिना असलेल्या डाळींचा उपयोग सुरू केला आहे. याशिवाय बेसनचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. गृहिणींचा कमी किमतीच्या पालेभाज्यांवर भर आहे.