चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातील रेवराल, खंडाळा, पिपरी, धानला, माेहाडी, दहेगाव, खात, धर्मापुरी व अराेली येथील शेतकऱ्यांनी ४० ते ४५ एकरांमध्ये टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटोच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याशी ताेंडी करार केला आहे. बाजारात टोमॅटोचे भाव काेसळताच व्यापाऱ्यांनी पाठ फिरविली असून, शेतकऱ्यांना टोमॅटो ताेडून बाजारपेठेत विकायला नेणे परवडण्याजाेगे नसल्याने त्यांनी ते राेडलगत फेकायला सुरुवात केली आहे.
माैदा तालुक्यातील शेतकरी नागपूर व भंडारा या दाेन बाजारपेठांमध्ये त्यांच्या शेतमालाची माेठ्या प्रमाणात विक्री करतात. भंडारा बाजारपेठेला शेतकरी प्रथम प्राधान्य देतात. लाॅकडाऊन काळात जिल्हाबंदी असल्याने बहुतांश शेतकरी नागपूरला शेतमाल विक्रीसाठी पाठवायचे. यातच काही शेतकऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून टोमॅटोची लागवड केली. व्यापाऱ्यांनी शेतात येऊन टोमॅटोचे दर ठरवायचे आणि ताेडलेले टोमॅटो घेऊन जायचे. टोमॅटो ताेडण्याची सूचना एक दिवस आधी द्यायची, असेही ठरविण्यात आल्याची माहिती खंडाळा (ता. माैदा) येथील आनंदकिशाेर येरल्लागड्डा यांच्यासह अन्य टोमॅटो उत्पादकांनी दिली.
व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून आपण टोमॅटोची ताेडणी केली आणि त्याला सूचना देण्यासाठी माेबाइलवर वारंवार संपर्क साधला असता व्यापारी प्रतिसाद देत नाही. ताेडलेले टोमॅटो गावात व परिसरातील गावांमध्ये कुणीही खरेदी करायला तयार नाही. ते नागपूर किंवा भंडारा शहरातील बाजारात विकायला न्यायचे म्हटले तर गावात वाहन मिळत नाही. शिवाय, टोमॅटो ठेवण्यासाठी कॅरेटदेखील नाहीत. त्यामुळे कॅरेटअभावी ते वाहनात फुटण्याची शक्यता असल्याने ते साधनांअभावी बाजारपेठेत न्यायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाल्याचे आनंदकिशाेर येरल्लागड्डा यांनी सांगितले. त्यामुळे ताेडणी केले टोमॅटो शेताशेजारील राेडलगत फेकल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, आपण शेतातील ५० कॅरेट टोमॅटोची ताेडणी केली. शिवाय, त्याची व्यापाऱ्याला वेळीच माहितीही दिली. व्यापारी येण्याची तब्बल चार दिवस प्रतीक्षा केली. व्यापारी न आल्याने, तसेच त्याने संपर्क न केल्याने शेवटी ताेडणी केलेले सर्व टोमॅटो राेडलगत फेकावे लागले, असे धानला (ता. माैदा) येथील टोमॅटो उत्पादक तेजराम चरडे यांनी सांगितले. व्यापारी साकाेली, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असल्याचे या दाेन्ही शेतकऱ्यांनी सांगितले.
....
ताेंडी करार
व्यापारी बाजारात असलेल्या भावाप्रमाणे शेतातून टोमॅटोची खरेदी करायचे. यात शेतकऱ्यांचा टोमॅटो वाहतुकीचा खर्च वाचत असल्याने त्यांनी ताेंडी कराराला हाेकार दर्शविला हाेता. बाजारात टोमॅटोचे दर काेसळल्याने व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीला अप्रत्यक्ष नकार दर्शविला आहे. या कराराचा शेतकऱ्यांकडे कुठलाही पुरावा नसल्याने त्यांना कुणाकडे दाद मागता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची माेठी अडचण झाली असून, त्यांना नुकसान सहन करण्यावाचून गत्यंतर नाही.
....
ताेडणीचाही खर्च निघेना
सध्या बाजारात टोमॅटोला प्रतिकिलाे ५ ते ७ रुपये भाव मिळत आहे. हा दर टोमॅटो ताेडणी व नागपूर अथवा भंडाऱ्यापर्यंतच्या वाहतुकीला परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अडीच एकराच एका वेळी १५० कॅरेट टोमॅटोची ताेडणी केली जाते. एका कॅरेटमध्ये २५ ते ३० किलाे टोमॅटो असतात. एका एकरातील टोमॅटोची एका वेळी ताेडणी करण्यासाठी २० मजूर लागतात. एका मजुराला प्रतिदिन किमान १५० रुपये मजुरी द्यावी लागते. ते नागपूर अथवा भंडाऱ्याला न्यावयाचे झाले तर २५ ते ३० रुपये प्रति कॅरेट वाहतुकीचा खर्च करावा लागताे. टोमॅटोला सध्या मिळणारा भाव व खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.