गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबाद ते बालाघाट अशा पायी प्रवासाला कामगारांचे ‘ते’ कुटुंब निघाले. मात्र चार वर्षाच्या लहानग्या मुलाला प्रवासाचा शीण आणि तळपते ऊन असह्य झाले. रस्त्यातच तो कासावीस झाला. त्याच्या आईवडिलांनी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना मदत मागितली. पण सर्वांनीच अव्हेरले. अखेर बाळाने आईच्या कुशीतच प्राण सोडला. आईने हंबरडा फोडला. मात्र आसवे पुसायला जवळ ना आप्तेष्ट होते; ना कुणी हितचिंतक... अखेर अश्रूंना बांध घालून त्यांनी नदीकाठावर खड्डा केला आणि बाळाला मूठमाती देऊन पुढचा रस्ता धरला.ही घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी ते पाटणबोरी या मार्गादरम्यानची. सुमारे आठवडाभरापूर्वीची ही घटना नागपूरमार्गे पोहचलेल्या कामगारांच्या माध्यमातून चर्चेला आली. ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या कानावर हा प्रकार पडल्यावर या घटनेची पुष्टी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन सरदार यांच्या माध्यमातून पाटणबोरी येथील एका स्वयंसेवकाशी संपर्क साधला, अन् हा प्रकार उजेडात आला.या कामगार कुटुंबामध्ये तीन लहान मुले, पत्नी, पती आणि अन्य दोन कामगार कुटुंब होते. हैदराबादला ते मजुरीच्या कामावर होते. लॉकडाऊनमुळे काम बंद पडल्याने आणि कसलेही वाहन नसल्याने ते महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील पिंपळखुटी ते पाटणबोरीदरम्यानच्या रेल्वे लाईनवरून पायी निघाले होते. डोक्यावर सामानाचे गाठोडे, कधी पायी तर कधी आईवडिलांच्या खांद्यावर बसून चालणारी लहान मुले, हातात पिशव्या असा त्यांचा प्रवास सुरू होता. मात्र उन्हामुळे या कुटुंबातील एका चार वर्षाच्या मुलाची पायी प्रवासात प्रकृती बिघडली. तो अस्वस्थ झाला. बेशुद्ध पडला. त्याची ही अवस्था बघून त्यांनी रेल्वे क्रॉसिंगवरील हायवेवर येऊन वाहनाची मदत मागितली. मात्र कसलीही मदत मिळाली नाही. अखेर बाळाने प्राण सोडला. अनोळखी प्रदेशात बाळाचा जीव गेल्याचे पाहून या सर्वांनीच हंबरडा फोडला. त्याच्या आईची अवस्था तर केविलवाणी झाली होती. अखेर त्याचे पे्रत घेऊन ते याच परिसरातील नदीच्या काठावर पोहचले. एकमेकांचे अश्रू पुसून त्यांनी धीर दिला. तिथे खड्डा करून बाळाला माती दिली.यानंतर हे कुटुंब पाटणबोरी येथील एका कॅम्पवर अन्न घेण्यासाठी आले. तिथे स्वयंसेवकांनी या कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रचंड दु:खावेगात असलेल्या त्या कुटुंबाशी आणि दुर्दैवी मातेशी कसलाही संवाद घडू शकला नाही. अतीव दु:खामुळे या कुटुंबातील कुणी जेवणही करू शकले नाही. काही वेळ थांबून ते पुन्हा करंजीकडे दोन लहान मुले आणि आपल्या सामानासह पायीच निघाले.अन् शोकांतिका प्रकाशात आलीया कामगार कुटुंबाचा संपर्क क्रमांक, नाव, पत्ता अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने ही घटना फारशी चर्चेत आली नाही. मात्र नागपुरात पोहचलेल्या काही मजुरांच्या माध्यमातून जामठाजवळ समाजसेवी संस्थेकडून अन्नछत्र चालविणाºया कॅम्पवर ही चर्चा कानावर आली. तो धागा पकडून पाटणबोरी येथील एका स्वयंसेवकाशी सदर प्रतिनिधीने संपर्क साधला असता या घटनेची पुष्टी झाली. त्यामुळेच काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारी ही एक शोकांतिका प्रकाशात आली.