लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - ५० लाखांच्या फ्लॅटचा सौदा केल्यानंतर ग्राहकांकडून ३२.५१ लाख रुपये घेणाऱ्या बिल्डरने हा फ्लॅट दुसऱ्याच ग्राहकाला विकून टाकला. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या फसवणूक प्रकरणात गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजेंद्र आत्माराम तायडे (वय ६१) असे पीडित तक्रारदारांचे नाव आहे. ते त्रिमूर्ती तिरुपती अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांनी २०१४ मध्ये प्रतापनगरातील माैजा भामटी येथे द एड्रेस नामक फ्लॅट स्कीममध्ये तिसऱ्या माळ्यावर ३०२ क्रमांकाचा फ्लॅट ५५ लाखांत विकत घेण्याचा साैदा केला होता. आरोपी बिल्डर अनिल मधुकरराव आसेगावकर (वय ६०, रा. गुलमोहर हॉलजवळ, खामला ) आणि रवींद्र बालाजी गोविंदवार (वय २४, रा. आनंदवन अपार्टमेंट खामला) यांना ३० ऑक्टोबर २०१४ ला ५१ हजार चेक द्वारे दिले होते. यावेळी एक वर्षाच्या आत फ्लॅटचे विक्रीपत्र करून देण्याचे ठरले होते. आरोपी आसेगावकर आणि गोविंदवार यांनी वेळोवेळी रकमेची मागणी केली. त्यानुसार तायडे यांनी आरोपींना एकूण ३२ लाख, ५१ हजार रुपये दिले आणि फ्लॅटचे विक्रीपत्र करून मागितले. मात्र, आरोपींनी त्यांना दाद दिली नाही. एवढेच काय, कोणतीही सूचना न देता आरोपींनी हा फ्लॅट दुसऱ्या ग्राहकाला विकून तायडेंची फसवणूक केली. त्यामुळे तायडेंनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी बरेच दिवस चौकशी केल्यानंतर आरोपी आसेगावकर आणि गोविंदवार या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती.