खासदार आदर्श गाव योजना : पहिल्या ‘वायफाय’ गावाचा दर्जा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव (ता. उमरेड) हे गाव देशातील २५ दत्तक गावांमध्ये अव्वल ठरले आहे. या गावात राबविलेल्या अनेक योजना, त्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी, तेथील विकास आदी बाबींमुळे पाचगावला मान मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातच या गावाची निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार दत्तक ग्राम म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाचगावची निवड केली होती. नागपूरपासून अवघ्या २० किमी आणि उमरेड या तालुक्याच्या ठिकाणापासून २८ किमी अंतरावर वसलेल्या पाचगावची लोकसंख्या ४९२३ असून ८२६ घरांच्या लोकवस्तीचे ठिकाण आहे. गडकरी यांनी हे गाव दत्तक घेताच तेथे विकासकामांचा धडाका लावला. देशातील पहिले वायफाय गाव होण्याचा मानही पाचगावला मिळाला. गावात ७३ योजना राबवून त्यातील ६२ योजना अर्थात ८५ टक्के काम पूर्णही झाले आहे. उर्वरित ११ कामे प्रगतिपथावर आहे. पाचगावमध्ये सामाजिक भवन, विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप, महिलांना शिवणयंत्राचे वाटप, ३५ सौरदिव्यांची व्यवस्था, अंगणवाडीचे काम, शाळा दुरुस्ती, हनुमान मंदिर परिसरात सभामंडप, १० बंधाऱ्यांची दुरुस्ती यासह विविध कामे करण्यात आली. संसद आदर्श या पाचगावात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था व्हावी यासाठी टाकी मंजूर करण्यात आली. ग्रामपंचायतमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट व्यवस्था करण्यात आली असून डिजिटल इंडियाच्या दिशेने गावाने पाऊल टाकले आहे. ई-लायब्ररीची व्यवस्था गावात करण्यात आली असून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नितीन गडकरी यांनी अॅम्बुलन्सचीही व्यवस्था केली. देशातील पहिल्या २५ गावांमध्ये पाचगावची निवड झाल्याचे पत्र केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नितीन गडकरी यांना पाठविले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात निवडलेल्या पाचगावबद्दल गडकरी यांंना शुभेच्छा देताना दुसऱ्या टप्प्यातही गावाची प्रगती व्हावी, असे नमूद केले आहे.
पाचगाव ठरले देशात अव्वल
By admin | Published: June 11, 2017 2:11 AM