---------------------------------
लोकमतने केला लक्षवेध -
---------------------------------
- वास्तव्य, मालमत्ता तसेच अन्य माहितीसाठी वर्कआऊट
---------------------------------
- संभाव्य धोका लक्षात घेता वाढली धावपळ
--------------------------------------
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल ११ वर्षे नागपुरात वास्तव्य करणारा तालिबानी नूर मोहम्मद आणि त्याचा साथीदार अब्दुल मतिन यांच्यासंबंधाने लोकमतने वृत्त प्रकाशित करताच तपास यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, फरार असलेल्या अब्दुल मतिनच्या संबंधाने शीर्षस्थ तपास यंत्रणांकडून स्थानिक पोलिसांना माहिती मागविण्यात आल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे पोलिसांनीही आता नव्याने या दोघांच्या ११ वर्षांच्या वास्तव्याचे लागेबांधे शोधण्यासाठी कसून वर्कआऊट सुरू केले आहे.
नागपूर पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी भारतातून हाकलून लावण्यासाठी नूर मोहम्मदला दिल्ली काबूलच्या विमानात बसविले होते. २३-२४ जूनला नूर काबूलला पोहचला अन् त्याने तिकडे तालिबान्यांचा वेश धारण करून एलएमजी (लाईट मशीन गन) हातात धरून आपला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. १५ ऑगस्टला काबूलमधील तख्तापलटचे वृत्त अन् नूर मोहम्मदचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला. या फोटोने तो तालिबानीच असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हाकलून लावण्यापूर्वीच नूरचा त्यावेळीचा रूम पार्टनर अब्दुल मतिन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सटकला. लोकमतने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी त्याची गंभीर दखल घेत, या दोघांच्या वास्तव्यादरम्यानचे लागेबांधे तपासणे सुरू केले आहे. फरार असलेल्या अब्दुल मतिनच्या संबंधानेही शीर्षस्थ तपास यंत्रणांनी कसून तपास चालविला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी या दोघांच्या भारतातील आगमनापासून तो ११ वर्षांच्या वास्तव्यादरम्यान त्यांची कुणाकुणाशी सलगी होती, त्यांना येथे घर मिळवून देण्यासाठी कुणी प्रयत्न केले. कुणासोबत त्यांची उठबस होती, त्याचीही कसून चौकशी चालविली आहे. यासंबंधाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. कुणीच यासंबंधाने बोलायला तयार नाही.
----
रेकी केली की...?
विशेष म्हणजे, नागपूर शहर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे अनेक वर्षांपासून टार्गेट आहे. येथे यापूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला आहे. अफगाणिस्तानातील सद्यस्थिती आणि तालिबान्यांची पाकिस्तानसोबत असलेली घसट भारतासाठी चिंतेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर, नूर मोहम्मद आणि मतिनने ११ वर्षांत येथे रेकी केली का, येथून काही फोटो अथवा संवेदनशील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तालिबान्यांना पाठविली काय, हा तपास यंत्रणांच्या चाैकशीचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. त्यासाठी तपास यंत्रणांनी वर्कआऊट सुरू केले आहे.
----
जमीन खा गई या आसमां निगल गया?
अफगाणमधून भारतात आल्यानंतर नूर मोहम्मद तसेच अब्दुल मतिनने नागपुरातील दिघोरी (नंदनवन) भागात डेरा टाकला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड अन् ड्रायव्हिंग लायसेन्स बनवून घेतले होते. एवढेच काय, मतिनने अवैध सावकारीतून येथे मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केली. नूर मोहम्मदला पकडण्यापूर्वी मतिन येथून गायब झाला, तेव्हापासून तो पोलिसांना मिळालाच नाही. त्यामुळे त्याला ‘जमीन खा गई या आसमां निगल गया’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
----