नागपूर : नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये असलेल्या भूस्तरामध्ये सर्वच प्रकारचे खडक आढळतात. यामुळे कुठे पाण्याची मुबलकता तर कुठे जलसाठा कमी, अशी स्थिती असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक मंगेश चौधरी यांनी दिली.
जलसाक्षरता अभियानांतर्गत जलसंधारणाच्या विविध उपाययोजना या विषयावर शेतकरी, कृषी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम बुधवारी झाला. नागपूर विभागाची भूशास्त्रीय रचना या विषयावर चौधरी यांनी मार्गदर्शन केले. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील भूस्तराची रचना, खडकांचे प्रकार, भूगर्भातील पाण्याची उपलब्धता, खडकांची पाणी धारण क्षमता यावर मार्गदर्शन केले. वार्षिक पाण्याचा ताळेबंद व सुरक्षा नियोजन या विषयावर नागपूरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने यांनी गावाची पाण्याची मागणी, सिंचन, पेयजल, औद्योगिक वापर यावर होणारा पाण्याचा वापर आणि नियोजन कसे असावे, याची माहिती दिली. पर्जन्यमान यंत्र बनविणे, त्याचा वापर करणे, विहिरींची पाण्याची पातळी मोजणे, नोंदी ठेवणे याबद्दल प्रशिक्षण दिले.
सेवानिवृत्त वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. व्ही. आर. भुसारी यांनी भूजल पुनर्भरण उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करताना वाहून जाणारे पाणी संकलन करणे, छतावरील पाण्याचे संकलन, पाण्याचे बळकटीकरण, पुनर्भरण, भूमिगत बंधारे याबद्दल मार्गदर्शन केले. तर, सहायक भूवैज्ञानिक डॉ. रेखा बोधनकर यांनी पाणी गुणवत्ता व त्यातील घटक तसेच शरीरावर होणारे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली. संचालन सहायक भूवैज्ञानिक ईशादया घोडेस्वार यांनी केले, आभार कनिष्ठ भूवैज्ञानिक राजेश गावंडे यांनी मानले.