राजीव सिंह
नागपूर : नामांकित कंत्राटदारांची नियक्ती करूनही पूर्व नागपुरातील नागरिकांना स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली छळण्याचेच काम झाले आहे. वास्तविक १८ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना ४९ महिन्यांनंतरही एक तृतीयांश काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.
स्मार्ट सिटीच्या नावावर निवडणुका जिंकणारे आता प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे लोकांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आहे. त्यात पारडी उड्डाणपूल, मेट्रो रेल्वेचे कासव गतीने सुरू असल्याने त्रासात भर पडली आहे. ४९.७६ कि.मी. रस्त्यांपैकी फक्त १२.३६ कि.मी. रस्त्यांचे काम झाले आहे; तर २८ पुलांपैकी १० पुलांचे काम सुरू आहे.
स्मार्ट सिटीचा मोबदला व चुकीच्या आराखड्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी व स्मार्ट सिटी बोर्डाचे संचालक मंडळ दाट लोकवस्तीवरून रस्ता निर्माण करण्यासाठी आग्रही आहेत. पारडी ते कळमनादरम्यान २४ मीटर रस्ता प्रस्तावित आहे. यामुळे ३०० घरे तुटणार आहे. काही रस्त्याखालून दूषित पाण्याची लाइन गेली आहे. अशा तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.
महिना अखेरीस निविदा काढणार - गोतमारे
शापूरजी पालोनजी यांनी प्रकल्पाचे काम बंद केले आहे. नवीन कंत्राटदार नियुक्तीसाठी महिनाअखेरीस निविदा काढण्याचे नियोजन आहे. काम तुकड्यात की एकत्र करावे, यावर संचालक मंडळा निर्णय घेईल. लकरच काम सुरू होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली.
- १० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश देऊन शापूरजी पालोनजी कंपनीला स्मार्ट सिटीतील ६५० कोटींचे काम दिले.
- १८ महिन्यांत ४९.७६ कि.मी.चे रस्ते, २८ पूल व ४ जलकुंभांचे निर्माण अपेक्षित होते.
- ४९ महिन्यानंतरही १२.३६ कि.मी. रस्ते, १० पूल व ४ जलकुंभांचे काम सुरू.
- कामे अपूर्ण असूनही कंपनीने ४४८.५८ कोटींच्या मोबदल्याची मागणी केली. संचालक मंडळाची १५.२५ कोटींचा मोबदला देण्याला सहमती.
- पूर्व नागपुरातील पारडी, पूनापूर, भरतवाडा, भांडेवाडी परिसरातील १७३० एकर क्षेत्राचा प्रकल्पात समावेश.