लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. आराेपीने तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडल्याचेही तिने पाेलीस तक्रारीत नमूद केले आहे.
सुथादिरा पुन्नाेस्वामी बालन (३५, रा. थाेमन गुडी, सेल्लूर, पाॅंडेचेरी) असे आराेपीचे नाव आहे. सुथादिरा हा आयकर विभागात आयुक्तपदी कार्यरत असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पीडित तरुणी २०१९ मध्ये नागपूर शहरातील हाॅस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत हाेती. सुथादिरा हा प्रशिक्षणासाठी नागपूरला आला हाेता. याच काळात ताे उपचारासाठी पीडित तरुणीच्या हाॅस्पिटलमध्ये आला आणि त्यांची ओळख झाली. तिला युपीएससी परीक्षेचे मार्गदर्शन घ्यावयाचे असल्याने ती त्याला फाेनवर संपर्क साधायची. त्यातच दाेघांचीही जवळीक वाढली आणि त्याने तिला विश्वासात घेत तिच्याशी लग्न करण्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने दहेगाव (रंगारी) (ता. सावनेर) येथील सनराईज हाॅटेलमधील खाेलीत तिच्याशी वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्यातच त्याने तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर तिचे आपत्तीजनक फाेटाे व व्हीडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने लग्न करण्याचा तगादा लावला असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तिने खापरखेडा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी सुथादिरा विरुद्ध भादंवि ३७६ (२), एन, अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक भटकर करीत आहेत.