लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरेबियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ओमानला पाठवलेल्या महिलेवर अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी मानव तस्करीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात एका महिलेलाही अटक केली आहे. बिल्किस खान मेहबूब खान (५०) रा. राऊतनगर, बाबा ताज कॉलनी असे आरोपीचे नाव आहे.पीडित ४० वर्षीय महिला सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीत राहते. तिचा पती एका प्रकरणात तुरुंगात आहे. कुटुंबात मुलगा व मुलगी आहे. महिला मजुरी करून घर चालवत होती. दरम्यान आरोपी बिल्कीस खानशी तिची ओळख झाली. तिने सौदी अरेबियात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. तिने सांगितले की, दोन वर्षासाठी तिला तिथे जावे लागेल. चांगली नोकरी, वेतन आणि राहण्याखाण्याची नि:शुल्क व्यवस्था होईल. दोन वर्षात लाखो रुपये कमावून ती परत येऊ शकते. पीडित महिला बिल्किसच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सौदी अरेबियाला जाण्यासाठी तयार झाली. बिल्कीसने पीडितेचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर सर्व आवश्यक दस्तावेज तयार केले. तिच्या जाण्याचा खर्चही स्वत:च उचलला. ३१ जुलै रोजी बिल्कीसने पीडित महिलेला ओमानला रवाना केले. तिथे एका कुटुंबाने तिला मोलकरणीच्या कामावर ठेवले. पहिल्याच दिवशी तिच्याकडून खूप काम करवून घेण्यात आले. तिला आराम करण्यासाठी पुरेसा वेळही दिला जात नव्हता. पोटभर जेवणही मिळत नव्हते. वेतनाबाबत विचारल्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे पीडित महिला खूप दु:खी झाली. तिला तिथे राहणे शक्य वाटले नाही. पीडित महिलेने तेव्हा तेथील कुटुंबाला भारतात परत जाण्याची इच्छा दर्शविली. तेव्हा लाखो रुपये देऊन करारावर तिला खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ते महिलेला तिच्या मुलीशीही बोलू देत नव्हते. तेव्हा तिने आपल्या मुलीला चोरून फोन केला आणि सर्व आपबिती सांगितली. मुलीने ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारावर पोलिसांनी फसवणूक आणि बंधक बनवण्याचा गुन्हा दाखल करून बिल्कीसला अटक केली. पीडित महिला अजूनही ओमानमध्ये आहे. ती नागपूरला परत येण्याची प्रतीक्षा करीत आहे.महिलेकडून काम करवून घेणारे कुटुंब आणि विदेश मंत्रालयाच्या स्तरावर पीडितेला परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिल्कीस महिलेला तिच्या मर्जीनुसार पाठवण्यात आल्याचे सांगत आहे. ती सुद्धा गरीब कुटुंबातील आहे.सहा महिन्यातील तिसरी घटनाचांगली नोकरी लावून देण्याच्या नावावर महिलांना खाडी देशांमध्ये पाठवून त्यांच्यावर अत्याचार केला जात असल्याची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी घटना आहे. पीडित महिला या गरीब कुटुंबातील असतात. तिथे गेल्यावर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर काम घेतले जाते. त्यांना जगणे कठीण होऊन जाते. परत जाण्याचा कुठलाही मार्ग दिसून येत नसल्याचे त्या हताश होतात. यापूर्वी पाठवण्यात आलेल्या महिलांना परत आणण्यासाठी पोलिसांना मोठे कष्ट घ्यावे लागले होते.दलालांच्या इशाऱ्यावर कामबिल्कीसने हे काम या व्यवसायात सक्रिय असलेल्या दलालांच्या इशाऱ्यावर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दलालांनी पीडितेला सौदी अरबला पाठविण्यासाठी पैसे आणि इतर मदत उपलब्ध केली. मजुरी-मोलकरीणसाठी इच्छुक परिवारांशी दलालांचा संपर्क असतो. मजूर, मोलकरीण उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात त्यांना चांगले कमिशन मिळते. या प्रकरणाचा तपास केल्यास दलालांची नावे उघडकीस येऊ शकतील.
नोकरीसाठी ओमानला गेलेल्या नागपूरच्या महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 8:15 PM
सौदी अरेबियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून ओमानला पाठवलेल्या महिलेवर अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. सक्करदरा पोलिसांनी या प्रकरणी मानव तस्करीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात एका महिलेलाही अटक केली आहे.
ठळक मुद्दे२० दिवसातच मानव तस्करीचा प्रकार उघडकीस : मुलीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल