नागपूर : कोरोनाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या टॉसिलिझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार होमिओपॅथीचा डॉक्टर होता. अंबाझरी पोलिसांनी उमरेडच्या खासगी रुग्णालयात तैनात असलेल्या फैजान खान (३०) या होमिओपॅथीच्या डॉक्टरला अटक केली आहे. फैजान एक डझन रेमडेसिविर आणि चार टॉसिलिझुमॅबचा काळाबाजार केल्याची माहिती पुढे आली असल्यामुळे पोलीसही अवाक् झाले आहेत.
झोन दोनच्या पथकाने एक लाख रुपयांत टॉसिलिझुमॅब इंजेक्शनची विक्री करताना बालाघाट येथील रहिवासी सचिन गेवरीकर (२०), विशेष ऊर्फ सोनू बाकट (२६) आणि रामफल वैश्य (२४) यांना अटक केली होती. पोलिसांना सचिनने एक लाख रुपयांत टॉसिलिझुमॅब इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती मिळाली होती. इंजेक्शनची मूळ किंमत ४० हजार ६०० रुपये होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सचिनला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून होमिओपॅथीचा डॉक्टर सोनू आणि रामफलला अटक करण्यात आली. त्यांनीच सचिनला टॉसिलिझुमॅब विक्रीसाठी दिले होते. पोलिसांना तपासात दोघांचा डॉ. फैजानसोबत संपर्क असल्याची माहिती मिळाली. चौकशी केल्यानंतर फैजानने टॉसिलिझुमॅब दिल्याची कबुली दिली. त्या आधारावर आज दुपारी डॉ. फैजानला अटक करण्यात आली. फैजान बालाघाटचा रहिवासी आहे. तो बालाघाटच्या होमिओपॅथी कॉलेजमध्ये सोनू आणि रामफलचा सिनिअर होता. कोरोना सुरू झाल्यानंतर त्याची उमरेडच्या एका खासगी रुग्णालयात नियुक्ती झाली. तो रुग्णालय परिसरातच राहत होता. डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे फैजानचा रुग्णालयात दबदबा निर्माण झाला होता. त्याचा फायदा घेऊन तो रेमडेसिविर आणि टॉसिलिझुमॅबची चोरी करू लागला. फैजानने आतापर्यंत एक डझन रेमडेसिविर आणि चार टॉसिलिझुमॅबची चोरी केली आहे. त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता त्याचे संकेत मिळाले. सोनू, रामफल आण सचिन इंजेक्शनची विक्री करीत होते. त्यांना फैजान टॉसिलिझुमॅब ६० ते ७० हजारांत उपलब्ध करून देत होता. तिघेही गरजूंकडून एक लाख रुपये वसूल करीत होते. या रॅकेटमध्ये रुग्णालयातील इतरही सहभागी असल्याची शंका आहे. त्याची माहिती मिळविण्यासाठी अंबाझरी ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद म्हात्रे यांनी फैजानची १ जूनपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे. तर, इतर तिघे शुक्रवारपर्यंत अटकेत आहेत.
............