लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानात जिल्ह्यात ७७,६६२ रुग्ण अतिजोखमीचे आढळले आहेत. यातील २७,४९० लोक मधुमेहाने तर ४,००५ हायपरटेन्शनने ग्रस्त आहेत. किडनीच्या आजाराचेही रुग्ण एक हजाराच्या जवळपास आढळले आहेत, तर यकृताचा आजार असल्याचे ४८६ लोक आढळले आहेत. या सर्वेक्षणातून अतिजोखमीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या लक्षात आल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह नागपूर जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जागृती मोहीम आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५ लाख ८६ हजार ६१२ कुटुंबातील २१ लाख ६४ हजार ३० लोकांची तपासणी करण्यात आली असून, यातील ७७ हजार ६६२ लोक अतिधोकादायक(कोमॉर्बिड)स्तरावर असल्याचे आढळून आले आहेत. जिल्ह्यात दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसरा टप्पाही आता आपल्या अंतिम चरणावर आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये १९९४ पथक तयार करण्यात आले.
या पथकामध्ये १ हजार ७१७ आशांनी सर्वेक्षणाचे काम केले असून, त्यांच्या मदतीला १११ अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या पथकाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला, सारी; तसेच संसर्गाशिवाय इतर आजार असलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, जोखमीचे आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्यशिक्षण दिले जात आहे. एक पथक सुमारे ५० घरांना भेट देऊन रुग्णांचे हृदयरोग, दमा, क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची माहितीही घेत आहे. अशा आजारांमुळे कोरोनाकाळात हे रुग्ण अतिधोकादायकस्तरावर असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.