दयानंद पाईकराव
नागपूर : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी गेल्या ९५ दिवसांपासून संपावर गेलेले आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाने कामावर रुजू झालेले मोजके चालक-वाहक, लाईन चेकिंगवरील कर्मचारी आणि खासगी एजन्सीच्या चालकांच्या भरवशावर काही बसेस सुरू केल्या. बसेस सुरू केल्याचे समजल्यानंतर प्रवासी बसस्थानकावर गर्दी करीत आहेत.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ४४१ बसेस आहेत. परंतु यापैकी मोजक्याच बसेस सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे इतर बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यात धावत आहेत ७२ बसेस
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ४४१ बसेस आहेत. परंतु कर्मचारी संपावर असल्यामुळे यातील बहुतांश बसेस आगारातच उभ्या असल्याची स्थिती आहे. कामावर रुजू झालेले मोजके चालक-वाहक, खासगी एजन्सीचे चालक यांच्या भरवशावर नागपूर विभागाने बसेसची वाहतूक सुरू केली आहे. परंतु केवळ ७२ बसेसच रस्त्यावर धावत असल्याची स्थिती आहे. या बसेसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
केवळ लालपरीच आहे सुरू
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात कर्मचारी संपावर असल्यामुळे केवळ लालपरीच रस्त्यावर धावत आहे. शिवशाही आणि हिरकणी या बसेस बंद आहेत. केवळ ७२ लालपरीच्या भरवशावर नागपूर विभागात प्रवाशांची वाहतूक सुरू आहे.
आगार - एकूण बसेस - सध्या धावत असलेल्या बसेस
घाट रोड - ५८ - १९
गणेशपेठ - ८१ - २३
उमरेड - ३७ - ३
काटोल - ४७ - १
रामटेक - ४४ - २
सावनेर - ३९ - ६
इमामवाडा - ४७ - ८
वर्धमाननगर - ३७ - ५
गणेशपेठ स्थानकावरून या मार्गावर धावताहेत बसेस
-एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारातून सध्या अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वरूड, मोर्शी, काटोल, उमरेड, रामटेक, सावनेर या मार्गावर बसेस धावत आहेत.
लांब पल्ल्याच्या बसेस सुरू कराव्यात
एसटी महामंडळाने काही मोजक्या बसेस सुरू केल्या. परंतु लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटीने लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्याची गरज आहे.
-प्रवीण आग्रे, प्रवासी
एसटीच्या बसेस सुरू झाल्या ही आनंदाची बाब आहे. परंतु रामटेकसह इतर ग्रामीण भागात अतिशय कमी फेऱ्या असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटीने ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांना दिलासा द्यावा.
-खुशाल जाधव, प्रवासी
कर्मचाऱ्यांचा पुरेपूर वापर करून अधिकाधिक बसेस मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर बसेसची संख्या वाढविण्यात येईल.
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर विभाग