नागपूर : आपण दिल्लीमधील मोठा कंत्राटदार असल्याचे सांगून विवाहेच्छुक तरुणी व महिलांना फसविणारा तोतया नवरदेव अखेर सोनेगाव पोलिसांच्या हाती लागला. एका साथीदारासह अटक करून रोख रकमेसह ७ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मिक्की सिंह जगजीतसिंह साहनी (३८) असे या आरोपीचे आणि आनंद उमेश साहू (३०) असे साथीदाराचे नाव आहे. दोघेही आमला (बैतुल, मध्य प्रदेश) येथील राहणारे आहेत. डीसीपी नुरुल हसन यांनी सोमवारी ही माहिती दिली.
सोनेगाव आणि प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमधून महिलांचे दागिने, नगदी रक्कम चोरण्याच्या दोन घटना घडल्या होत्या. ७ नोव्हेंबरच्या पहिल्या घटनेत गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील ४२ वर्षीय महिलेचे एअरपोर्ट सेंटर पाॅईंट हॉटेलातील ३०३ क्रमांकाच्या खोलीतून मोबाईल, दागिने आणि नगदी अशा सव्वादोन लाखांच्या वस्तू चोरण्यात आल्या होत्या. तर ३० नोव्हेंबरच्या रात्री मल्टी नोएडा (उत्तर प्रदेश) येथील ३८ वर्षीय महिलेची हॉटेल रेडिसन ब्ल्यूमधील खोलीतून मोबाईल, दागिने आणि नगदी ३८ हजार रुपयांची रक्कम चोरीस गेली होती. पहिल्या घटनेत आरोपीने स्वत:चे नाव रिंपी खंडूसा तर दुसऱ्या घटनेत रोमी अरोरा सांगितले होते. दोन्ही वेळी स्वत:चा पत्ता दिल्लीमधील ग्रेटर कैलाश असा दिला होता. दोन्ही गुन्ह्यातील एकच पद्धत लक्षात घेऊन पोलिसांनी तपास आरंभला. हॉटेलातील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आरोपी आल्याचे दिसले. त्यावरून मिक्कीचा शोध लागला. त्याला बैतूलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.
आनंद साहू याने तयार करून दिलेल्या बोगस आधार कार्डवरून हॉटेलमध्ये बुकिंग केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मिक्कीने चोरलेला मालही तोच खरेदी करायचा. यावरून पोलिसांनी आनंदलाही अटक केली. मिक्की हा बैतूलमधील प्रतिष्ठित कुटुंबाशी संबंधित आहे. त्याचे नातेवाईक विदेशात राहतात. दोन वर्षापूर्वी त्याचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर त्याने हा प्रकार सुरू केला. त्याचे विवाहविषयक तीन साईटवर प्रोफाईल आहेत. त्या माध्यमातून तो महिलांना फसवितो. आपण दिल्लीत मोठा ठेकेदार असल्याचे सांगून लग्न करण्यासाठी नागपुरात बोलावतो. स्वत:च विमानाचे तिकीट आणि हॉटेलही बुक करतो. त्यामुळे त्याच्यावर महिलांचा विश्वास बसतो.
जबलपूर आणि भोपाळमध्येही महिलांना असेच फसविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. महिलांकडून फक्त चोरीची तक्रार आली आहे. मात्र फक्त चोरीसाठीच तो हा सर्व प्रकार करत असावा यावर पोलिसांचा विश्वास नाही. ही कारवाई डीसीपी नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप सागर, पीएसआय टी.एम. ढाकुलकर, बारगल, कर्मचारी संजय चामटकर, सुशील, रवींद्र, शैलेश, चेतन तसेच अश्विनी यांनी केली.
...
१०० महिलांसोबत कनेक्शन
मिक्की साहनी १०० महिलांच्या संपर्कात होता. त्यांच्याशी तो चॅटिंग करायचा. यातील ८ महिला नागपुरातील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक महिलांनी बदनामीच्या भीतीपोटी तक्रार केलेली नाही. अटक झाली नसती, तर त्याने अनेक महिलांना फसविले असते.
...
पीडित महिलांनो, तक्रारीसाठी पुढे या
डीसीपी नुरूल हसन यांनी पीडित महिलांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तक्रारकर्त्या महिलांचे नाव गोपनीय राखले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
...